एका डायरीतील पाने

१ जानेवारी:
वजन १०० किलो

११.१५ ए एम्
वजन कमी करायला हवे. रोज हे वाक्य सकाळी वाचायचे. दिवसभरात ते मनात घोळत रहायला हवे. मनात असेल तेच तनात येईल. हे अलंकारिक वाक्य किती सहज लिहून झाले. वजन कमी होताना लेखनही होईल.

२ पी एम्
कालचा हॅंगओव्हर अजून आहे. कालचं राहीलेलं जेवण संपवायला हव. काल लोक अपेक्षेप्रमाणे जेवले नाहीत. सगळेचजण गुपचुप वजन कमी करण्याचा विचार तर करीत नसावेत ना? इतकं चांगल जेवण टाकून कसे देणार ? अन्न हे पूर्णब्रह्म असते. माझा कृतनिश्चय आणि अन्न फुकट न घालविणाची सामाजिक जाणीव यात स्वत:ला दुय्यम स्थान देता आले पाहिजे. सामाजिक जाणिवा टोकदार हव्यात.
आज कालचे अन्न संपवून उद्यापासून कृतनिश्चय पाळावा हे बरे. संध्याकाळी भरपूर रपेट करावी.

७.४५ पी एम्
दुपारी हेवी जेवण झाले. वामकुक्षी वजन कमी करण्यासाठी चांगली म्हणून जेवण झाल्यावर वामकुक्षी साठी लवंडलो तो आत्ता जाग आली.
आता अंग ही जड झाले आहे. दुपारी जास्त झोप झाली तर आवाज धोगरा होतो. तसेच स्नायू मंदावतात. अशा स्थितीत चालण्याचा ताण पडला तर स्नायूंना इजा होउ शकते.
एक दिवसाच्या जिद्दीसाठी इजा करून घ्यायला नको. उद्यापासून चालणे करायचे म्हणजे करायचेच

८.१६ पी एम्
वजन कमी करण्यासाठी रात्री लवकर जेउन लवकर झोपायला हवे. हलकीशी मूगडाळ खिचडी, तूप, आवळ्याचं लोणच आणि पोह्याचा एक पापड दह्याबरेबर इतक खाउन आज लवकर झोपतो म्हणजे उद्या लवकर उठता येईल

१० पी एम्
दूध हळद पिउन घेतली
उद्या सकाळपासून शुभस्य शीघ्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X