फेसबुकवर अनेक चर्चा आणि वाद सातत्याने चालू असतात. त्यात अनेक जण हिरिरीने भाग घेतात . फेसबुकवरच ज्ञान मिळवून फेसबुकवरच तज्ञ म्हणून वावरणारे अनेकजण असतात. यातील बरेच जण हे यशस्वी असतात . वाचन आणि मिळालेले यश यांतून त्यांचे तज्ञत्व जन्म घेते. त्यांच्या नैसर्गिक हुशारीने आणि नशिबाने त्यांना यशाचा मार्ग सापडलेला असतो. प्रॉब्लेम असा असतो की एकाला लागू पडलेला मार्ग दुसऱ्याला लागू पडेलच असे नाही.
बरेचदा डायबेटीस आणि वजन कमी करण्याच्या बाबतीत वॉटस ॲप, फेसबुकवरून किंवा गुगलवरून उपचार शोधले जातात. एखादा लिहितो की मी गवतीचहा प्यायला, आणि माझा डायबेटीस बरा झाला. पोस्टमन वृत्तीमुळे हे असले शहानिशा न केलेले मेसेजेस लगेच पुढे पाठवले जातात आणि भारावून जावून अनेक जण गवतीचहा प्यायला लागतात.
वजन कमी करण्याच्या बाबतीत तर हे फार मोठ्या प्रमाणात होते. वजन कमी करून प्रसिद्धी मिळते हे अर्धसत्य आहे. प्रसिद्ध होण्यासाठी अनेक जण वजन कमी करतात. वजन कमी करणे हे तसे कठीण काम आहे. त्यामुळे हे कठीण काम करून दाखवणारी व्यक्ती मग आहार, व्यायाम, औषधोपचार, मधुमेह, सर्जरी, आणि इतर अनेक गोष्टींवर ठामपणे मते नोंदवू लागते. ज्याला वजन कमी करण्याचे महाकठिण काम जमले तो हुषार, कर्तबगार, ज्ञानी, पराक्रमी, सचोटीचा, मन:शक्तिधारक, यशस्वी असणार अशी सर्वांची धारणा होते. स्वत:चे स्थूलातून सूक्ष्मात जाण्याचे फोटो टाकणारा माणूस सर्वज्ञ असतो यावर विश्वास ठेवणारी माणसे असतात.
पूर्वीच्या काळात नाही का मुलीच्या लग्नासाठी ‘पण’ असायचे. राजा जाहीर करायचा; “जो कुणी राजकन्येच्या अत्यंत आवडत्या आणि मारकुट्या गाईंचं चरवीभर दूध काढून दाखवेल त्याला अर्ध राज्य आणि राजकन्या मिळेल”. हा काय क्रायटेरिया आहे का जावई आणि राजा बनण्यासाठी. त्या काळातही लोकांना ‘जे शिकला’ ते सोडून इतर कशात तरी तज्ञ असणाऱ्या माणसावर जास्त भरवसा. आमच्या बाजूला एक व्हेट आहेत. ते गांडूळशेतीतील तज्ञ आहेत म्हणून त्यांना मानतात लोक.
हल्ली सीझर न होता जिची नॅार्मल डिलिवरी होते ती लगेच सल्ले द्यायला लागते . ‘सीजर करण्याची गरज नसते, सुरवाती पासून गर्भसंस्कार आणि योग केला की डिलीवरीला काही त्रास होत नाही” वगैरे वाक्यं अनुभवातूनच प्रसवलेली असतात. ही नवप्रसूत सीजरतज्ञा, गायनॅाकॅालॅाजिस्ट कसे ‘जरूर नसताना सीजर करतात, पैसे काढतात’ वगैरे सल्ल्यांचाही रतीब घालायला लागते.
गेली अठ्ठावीस वर्ष, बेरियाट्रिक सर्जरी रूढ होण्या अगोदरपासून, याच क्षेत्रात मी कार्यरत असल्याने गेले काही दिवस अनेकांनी मला ह्या सर्जरीबद्दल काही लिहाल का ? शास्त्रीय माहिती वाचायला आवडेल असं विचारल्याने आजचा लेख लिहितोय. जेव्हा जेव्हा फेसबुकवर अनेकदा वजन कमी करण्यासंबंधी कुणी काही लिहिलेलं असलं की मी ते नजरेखालून घालतो तेव्हा एक गोष्ट ठळकपणे जाणवते ती अशी की यातील ठाम मते मांडणारे, धारधार टीका करणारे डॅाक्टर, सर्जन तर नाहीतच पण कुणी सर्जरी करून घेतलेले पेशंट पण नाहीत. बहुतेक हे सुरवातीस वर्णन केलेले स्वसूक्ष्मत्व पावलेले ज्ञानी किंवा समाजमाध्यमपदविधारक असतात . फेसबुकवर यांना सेलिब्रिटी स्टेटस मिळालेलं असतं .
यातील सर्जरी करण्याची गरज नसते हे सांगणाऱ्यांचा एक सूर असा असतो की , ‘ स्वत:वर, तोंडावर ताबा ठेवला की वजन कमी होतेच.’. वजन वाढणे हा एक आजार आहे, तोंडावर ताबा ठेवता न येणे हे आजाराचे लक्षण आहे, यात काही हॅार्मोन्सचा संबंध आहे, त्या माणसाच्या स्ट्रेस मुळे त्याचा मेटॅबॅालिक रेट बदलतो, यात काही वाटा हेरिडिटीचा असतो या गोष्टी या सल्लाकारांच्या गावीच नसतात. डिप्रेशन आले तर, ‘पाजिटिव रहा’ वगैरे सांगून किंवा ‘कुणी प्रसिद्ध व्यक्ती कठीण प्रसंगातून जिद्दीने कसा बाहेर आला’ या गोष्टी सांगून त्याचे डिप्रेशन जात नाही. ज्याचे मस्त चालले आहे किंवा स्वभावात:च जो कणखर असतो, तोच अशा गोष्टी सांगू शकतो. बाकी सर्वसामान्यांना मदत लागते. अशावेळी सर्वसामान्य माणसांनी लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे, समुपदेशन, आहार आखणी, व्यायामाची मांडणी, औषधोपचार आणि सर्जरी अशा अनेक पातळ्यांवर ही मदत लागते. आज सर्जरीबद्दल लिहायचे आहे, म्हणून बाकी सर्व पुढील लेखांसाठी राखून ठेवतो.
तर सर्जरी करण्याचा निर्णय घेण्याचे निकष कोणते ?
ज्यांचा बीएम्आय् हा ४० पेक्षा जास्त असेल, ज्यांनी वजन उतरवून ते स्थिर ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत पण त्यात यश आलेले नाही,
किंवा बीएम्आय् ३५ पेक्षा जास्त आहे, ज्यांनी वजन उतरवून ते स्थिर ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत पण त्यात यश आलेले नाही, आणि सोबत मधुमेह, रक्तदाब तीव्र स्वरूपात आहेत,
ज्यांच्या घराण्यात कॅन्सरची हिस्ट्री आहे,
ज्यांना मनावर ताबा ठेवता येत नाही आणि तसा ठेवण्यासाठी मदतही मिळण्याची शक्यता नाही,
ज्यांना पुढील आयुष्यात कॅांप्लिकेशन नको आहेत;
अशा लोकांसाठी सर्जरी हा प्रूव्हन फर्स्ट चॅाईस आहे. सर्जरी न केल्याने होणारे त्रास हे सर्जरी करून होणाऱ्या त्रासांच्या कैकपट अधिक असतात.
जर अशी सर्जरी करायची ठरली तर त्या माणसाचा फिटनेस पूर्णपणे तपासावा लागतो. त्याच्या लिव्हरचा साईज नॅार्मल हवा, त्याच्या फुफुसांची क्षमता उत्तम हवी, हार्ट नॅार्मल हवे. सर्जरी यशस्वी पण पेशंटचे आयुष्य अयशस्वी असे व्हायला नको ही भिती पेशंटला तर असतेच पण सर्जनलाही असते. म्हणून पूर्ण तपासणी करूनच मग सर्जरीचा निर्णय घेतला जातो, वेळ ठरवली जाते. परदेशात या सर्जरीसाठी विम्याचे कवच असते. आपल्याकडे अजूनही यासाठी विमाकवच नाही. थोडक्यात सर्जरी करून क्लेम करता येत नाही. यामुळे आणि एकंदरीतच ही सर्जरी महाग असल्याने अनेकांना हा प्रकार ‘पैसे काढण्यासाठी सुचवलेला उपाय’ वाटतो. उद्या या सर्जरीसाठी विमाकवच मिळू द्या, मग बघा किती लोक स्वत:हून ही सर्जरी करायला तयार होतील ते.
लेख लांबवायचा नाहीये म्हणून जाताजाता काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद करतोय. आतड्याचे तुकडे कापून टाकून आतडं लहान कारणं ही चुकीची माहिती आहे. बॅरिॲट्रिक सर्जरी हा एकच प्रकार नसून या सर्जरीत अनेक प्रकार आहेत. या सर्जरीमुळे झालेला वेटलॅास पर्मनंट नसतो. पुन्हा वजन वाढू शकते. सर्जरीमुळे काही वर्ष मिळतात ज्यात इतर आजारांवर नियंत्रण मिळवून कॅांप्लिकेशन कमी करता येतात. या सर्व प्रकारात पेशंटची सिस्टिम लगेच कोसळू नये म्हणून वेळ मिळवून देणे हा मुख्य उद्देश असतो.या सर्जरी नंतर खाण्यापिण्यात अमूलाग्र बदल होतात, ते मनाने स्वीकारण्यासाठी एक संधी म्हणजे सर्जरी. सर्वात महत्वाचं म्हणजे, या सर्जरीची स्वत:ची अनेक कॅांप्लिकेशन्स आहेत. ती सर्व समजावून देउन मगच सर्जरीचा निर्णय पेशंटवर सोडणे हे सर्जनचे कर्तव्य असते. नुसते आधी आणि नंतरचे फोटो दाखवून सर्जरी करायला हवी असे सांगणाऱ्या सर्जनपासून लांब रहावे किंवा त्याच्याकडून सर्जरी करून घेऊ नये. बाकी इतर सर्जरी करणारा आणि बॅरिॲट्रिक सर्जरी पण करतो असा सर्जन निवडावा.
अनुभवातून विस्डमचा सल्ला देतोय, वजन हा एक आजार आहे. त्यावर फुकटचे सल्ले देणाऱ्या लोकांपासूनही सावध रहावे हे उत्तम.
Innocents with good Intentions may have risky hands हे कधीही लक्षात ठेवणं गरजेचं आहे .
Nitin Patankar, MD (MED)
Consultant – Diabetes, Obesity and Lifestyle Disorders
Wisdom Clinic – Thane
Jupiter Hospital Thane
Contact : 9223145555