गीता आजीच्या गोष्टी – १०

गीता आजी आज दुसऱ्या अध्यायातील काही गोष्टी सांगते आहे. प्रत्येक अध्यायात अर्जुनाने विचारलेला प्रश्न हा केंद्रस्थानी ठेवून मग कृष्ण काय सांगतो ते समजून घ्यायला हवे.
दुसऱ्या अध्यायात अर्जुनाने काय प्रश्न विचारला आहे ? तर तो आहे आठवा श्लोक.

न हि प्रपश्यामि ममापनुद्याद् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् ।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥

पृथ्वीवर निष्कंटक समृद्ध राज्य किंवा स्वर्गाचे स्वामित्व मिळाले तरी इंद्रियांना शोषून टाकणारा हा माझा शोक दूर करण्याचे साधन काय आहे?

क्षत्रिय धर्म आणि स्वधर्म पाळायचा आहे, तो पाळताना गुरूहत्या आणि कुलक्षय होणार आहे. या हत्यांचा आणि कुलक्षयाचा भविष्यात अर्जुनवर होईल असा परिणाम म्हणजे मनांत राहणारी गिल्ट, खंत किंवा शोक. या भावनांना ‘निगेटिव इमोशन्स’ (Negative Emotions) म्हणतात. निगेटिव चा अर्थच ‘आयुष्याची उर्जा नाहीशी करणारा’ असा आहे. निगेटिव भावनांनी ग्रासले की आयुष्य जगण्याची त्रिपदी (आनंद, आशा आणि समाधान) नाहीशी होते. भविष्यात शोकाने ग्रासले तर विजयाचा आनंद राहणार नाही. या निगेटिव इमोशन्स टाळण्यासाठी स्व समुपदेशन कसे करू? सेल्फ टॅाक काय ठेवू हा खरा प्रश्न आहे. तो शोक मुळात उत्पन्न होउ नये या साठी पुढे होणाऱ्या शोकाचे मूळ म्हणजे आजचे हाती घेतलेले काम सोडून द्यावे, संन्यास घ्यावा असे अर्जुनाला वाटते आहे. हा शोक किंवा इतर निगेटिव इमोशन्स हॅन्डल करण्याचे दोन मार्ग आहेत. एक सांख्य किंवा संन्यास आणि दुसरा योग म्हणजे कर्मफलसंन्यास. सुरवातीस सांख्य तत्वज्ञानानुसार आणि नंतर योग तत्वज्ञानानुसार, दोन्ही दृष्टीनी विचार केला तरी तुला आत्ता युद्ध करणे हेच धर्मयुक्त वर्तन आहे हे कृष्ण सांगतो आहे.

दुसऱ्या अध्यायातील ३९ वा श्लोक हा मध्यबिंदू धरून दुसरा अध्याय समजून घेणे सोपे आहे.

एषा तेऽभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि॥३९॥

या श्लोकात कृष्ण म्हणतो, “अर्जुना, तुला आत्तापर्यंत सांख्य दृष्टिकोन ठेवून मिळणारे ज्ञान वर्णन केले, इथून पुढे कर्मयोगानुसार मिळणारे ज्ञान वर्णन करतो.
या श्लोकाला म्हणून दुसऱ्या अध्यायाचा मध्यबिंदू म्हणायला हवे ३९ व्या श्लोकाच्या पूर्वीचे श्लोक बघू. श्लोक ११ ते श्लोक ३८ या मधे सांख्य किंवा संन्यासमार्गे विचार कसा केला जातो ते कृष्ण सांगतो. तसा विचार केला तरीही शेवटी शोक करणे योग्य नाही हेच सार निघते असे कृष्ण पटवून देतो. ११ वा श्लोक

अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्र्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्र्च नानुशोचन्ति पण्डिता: ॥११॥

कृष्ण म्हणतो आहे, ज्या गोष्टींचा शोक करू नये त्या गोष्टींचा शोक करतो आहेस आणि ज्ञानी पंडीत असल्यासारखा बोलतो आहेस. कोणाचे प्राण गेले काय किंवा राहिले काय, या गोष्टींचा ज्ञानी पंडीत शोक करीत नाहीत.

काय विचित्र कल्पना आहे ना ? ज्ञानी लोक प्राण गेल्याचा शोक करीत नाहीत.
आपण काहीतरी करून एखाद्या व्यक्तीला वाचवू शकलो असतो पण ते घडले नाही तर दु:ख आणि शोक होतोच ना ? वेंटिलेटर काढण्या करता नातेवाईकांना विचारले तरी दु:ख होते. इथे तर अर्जुनाला आपले गुरू आणि पितामह यांना चक्क मारायचे आहे. ते आपल्या हातून मारले गेले तर शोक होणार ना? तरीही कृष्ण सांगतो आहे की ज्ञानी माणसे प्राण गेले काय किंवा राहिले काय याचा शोक करीत नाहीत ? ज्ञानी असणे म्हणजे भावनारहित असणे असे समजायचे का? आजच्या काळात (Artificial Intelligence) किंवा रोबो यांना ज्ञानी म्हणायचे का ? याचे उत्तर गीता आजीने मला दिले ते शेवटी दिले आहे.

आता १२ वा श्लोक बघू
न त्वेहाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपा: ।
न चैव न भविष्याम: सर्वे वयमत: परम् ॥१२॥

याचा अर्थ ? मी पूर्वी कधी नव्हतो असे नाही, तू आणि बाकी सर्व राजे पूर्वी नव्हते असे नाही. आपण सर्व पुढे होणार नाही असे नाही. याचा अर्थ पुर्नजन्म होत राहणार असा घेतां येतो. हिंदू धर्मात आणि इतर धर्मात हा एक मोठा फरक आहे. मुसलमान किंवा क्रिस्ती धर्मात मरणानंतर कयामत किंवा साल्व्हेशन पर्यंत माणूस कबरीत आराम करीत पडून राहतो म्हणून माणूस गेल्यावर (Rest in Peace RIP) म्हणायची पद्धत आहे. हिंदू धर्मात केल्या कर्मानुसार पुनर्जन्म मिळत राहतो. सर्व धर्मात धार्मिक वर्तनासाठी प्रवृत्त करण्यासाठी म्हणून स्वर्ग आणि अधर्म आचरणापासून परावृत्त करण्यासाठी नर्क या कल्पना आहेत.

माणसाचे प्राण पंचतत्वात विलीन होतात, नश्वर देह पंचतत्वात विलीन होतो; मग तरीही कयामत, साल्व्हेशन च्या वेळेस इश्वर कुणाला जवळ करतो? किंवा पुनर्जन्म होतो तो कुणाचा ? १२ व्या श्लोकात वर्णन केलेला ‘मी’ कोण ?

हिंदू धर्मात अजून एक कल्पना आहे की जन्ममरणाचा फेरा सुटला की मोक्ष मिळतो तो कोणाला ? (हिंदू धर्मात म्हणून माणूस मेल्यावर आत्म्यास सद्गती मिळो असे म्हणतात)
प्राण किंवा देह (यांत शरीर, मन, बुद्धी सर्व आले) यां पेक्षा वेगळे तत्व असते. त्याला ‘आत्मा’ ही संज्ञा आहे. हा आत्मा नवीन शरीर धारण करतो, त्यात पंचप्राण फुंकतो. पुढील बरेच श्लोक हे आत्मा नित्य आहे, त्याला मारता येत नाही, तो जळत नाही, भिजत नाही म्हणजे त्याच्यावर कसलाही परिणाम होत नाही हे सांगतात. आत्मा जे शरीर धारण करतो ते बाल्य ते वार्धक्य अशा स्थितीतून जाते, जुने वस्त्र बदलून नवे वस्त्र धारण करावे तसा आत्मा नवीन देह धारण करतो अशी अनेक उदाहरणे दिली आहेत.
या सर्वांचे सार काय ?

सांख्य तत्वज्ञानानुसार भावना आणि कामना यामुळे कुठचेही बरेवाईट काम आपण करतो. त्या कामाचे परिणाम हे बक्षीस किंवा शिक्षा, सुख किंवा दु:ख या स्वरूपात मिळतात. त्यातून नवीन भावना जन्म घेतात. त्या पुन्हा नवीन काही करायला प्रवृत्त करतात. हे सर्व करताना आत्मा त्यात अडकून पडतो. हे टाळण्यासाठी सर्व कर्म सोडून देउन संन्यास घेतला तर कर्मांच्या चक्रात आत्मा न अडकता तो मुक्त होतो असे सांख्य तत्वज्ञान सांगते. या तत्वज्ञानानुसार ‘सेल्फ टॅाक’ काय असावा हे कृष्ण सांगतो आहे.
धर्म रक्षणासाठी आणि स्वधर्म पालनासाठी तुला युद्धात जवळच्या माणसांना मारावे लागले तरी तू त्यांचा, केव्हातरी मरणारच आहे तो देह तू आज मारीत आहेस. देहासोबत त्यांचे अधर्माला साथ देणारे विचार मारीत आहेस. तू त्यांचा आत्मा ज्याने हा देह आणि प्राण धारण केला आहे तो काही मरणार नाही. तुला त्याचे पाप लागणार नाही. हे सांख्य विचाराप्रमाणे ज्ञान झाले की, आपण त्यांना मारले हा शोक नाहीसा होईल.
३७ वा श्लोक आहे

हतो वा प्राप्यसी स्वर्गं जित्वा वा भोक्षसे महीम्।
तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय:॥३७॥
युद्धात मरण पावलास तर स्वधर्म पाळताना मेलास म्हणून स्वर्गात जाशील, जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. तेव्हा आता उठ आणि युद्ध कर.

इथे गीता आजीने डोळे मिचकावून मला सांगितले, खास तुझ्या विचारासाठी एक खाद्य देते. सांख्यांना अपेक्षित असलेले आत्म्याबद्दलचे ज्ञान, तुझ्या ज्ञानेश्वराला झाले तसे सर्व जिवंत स्त्रीपुरुषांना बालवयातच हे ज्ञान प्राप्त झाले आणि बालवाडीतच सगळ्यांनी संन्यास घेतला तर काय होईल ? हे जग ज्याने कुणी निर्माण केले त्या निर्मितीच्या विपरीत हे होणार नाही का?
दुसरे म्हणजे आत्मा या सुखदु:ख देण्याच्या चक्रात अडकून पडला आहे, त्याला यातून मुक्तता हवी आहे असे कुणी सांगितले?

ज्याने आत्मा घडविला, त्यानेच बाकी सर्व निर्माण केले. द्वैत त्यानेच निर्माण केले. दुष्ट आणि सुष्ट त्यानेच निर्माण केले. धर्म पण त्यानेच निर्माण केला आणि अधर्म ही. ज्यांच्या माथी धर्माचरण लिहिले आहे (पुष्कळांचे पुष्कळ सूख आणि अनेक पिढ्यांपर्यंत मोठ्या समुहाला धरून ठेवेल असे वागणे) त्यांनाच काही खास भावना पण दिल्या आहेत. आपण करतो ते धर्माचरण आहे ना हे पुन्हा पुन्हा तपासून घेण्यासाठी मोह किंवा संभ्रम ही भावना आहे. धर्माचरणाच्या विपरीत निर्णय घेतले गेले तर तसे पुन्हा होउ नये म्हणून पश्चात्ताप, शोक या भावना आहेत. अधर्माचरणाविरुद्ध लढण्यासाठी क्रोध ही भावना आहे. काय करावे, काय फल हवे हे बुद्धी सांगते. त्या कर्माचे फळ किंवा निष्पत्ती बुद्धी सांगते. ते करणे धर्माला धरून आहे ना हे ठरविण्यासाठी भावना निर्माण केल्या आहेत. भावना या कर्माचे फल मिळाल्यानंतर त्या मुळे पुन्हा काय भाव निर्माण होतील हे ही सांगतात. इंग्रजीत एक ‘डेव्हिल्स ॲडव्होकेट’ ही कल्पना आहे. भावना बरेचदा हे डेव्हिल्स ॲडव्होकेटचे काम करतात. या भावनांच्या आवर्तात सापडून, कर्मघात (paralysis of action OR avoidance of action) होण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी कृष्ण कर्मफलसंन्यासाबद्दल सांगू लागतो.
ती गोष्ट पुढे
©नितीन पाटणकर

लेख आवडले तर नावासकट नक्की शेअर करा. ‘हेल्थ ॲंड विस्डम’ पेज ला लाईक करा. In Search of Wisdom या यू ट्यूब चॅनेल वर इतर बरेच विडिओ मिळतील. ते चॅनेल लाईक करा, सबस्क्राइब करा.

#गीता_आजीच्या_गोष्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X