गीता वाचताना टिळकांना प्रश्न पडला, की जी गीता ‘अर्जुनाला, उठ, युद्ध कर, जग जिंकून घे, कीर्ती प्राप्त कर’ इत्यादी सांगते; ती गीता संन्यासमार्गी कशी असेल? म्हणून त्यांनी त्यांवर चिंतन करून, गीतेतील मुख्य प्रतिपाद्य ‘कर्मयोग’ आहे असे सिद्ध केले.
हे लोकांना सांगण्यासाठी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहीला. आद्य शंकराचार्यांनी शांकरभाष्य लिहून गीतेतील सार लोकांपर्यंत पोचविले. नंतर रामानुजाचार्य, माधवाचार्य ते ज्ञानेश्वरांपर्यंत अनेकांनी गीतेत काय सांगितले आहे ते लोकांपर्यंत पोचविण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. ज्ञानेश्वरांच्या आधीचे गीतेवरील बहुतेक ग्रंथ हे संस्कृतमधे लिहिले गेले. ते ज्ञान प्राकृतात म्हणजे मराठीत लोकांपर्यंत पोहचावे म्हणून ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली. यातील बहुतेक सर्व ग्रंथ हे तपस्वी, योगीराज, प्रकांडपंडित आणि संन्यस्तवृत्तीच्या कवींनी लिहिले आहेत. त्या मुळे गीतेवरील टीकाग्रंथ देखील गेय स्वरूपात आहेत.
गीता या शब्दाच्या अर्थातच,गेयता दडलेली आहे. त्या मुळे गीतेवरील बहुतेक ग्रंथ हे काव्यप्रतिभा असलेल्या संन्यस्तवृत्तीच्या पंडितांनी लिहिले असे म्हणतां येईल. त्या मुळे गीतेवरील बहुतेक टीकाग्रंथातून गीतेचा अर्थ किंवा अध्यायांचे सार सांगताना भक्ती किंवा संन्यास हे गुण प्रामुख्याने समोर येतील अशी रचना झाली आहे.
कुणी असेही म्हणतात की गीतेतील पहिले सहा अध्याय हे कर्मयोगप्रधान आहेत. पुढील सहा अध्याय हे भक्तिरसप्रधान आहेत तर शेवटचे सहा अध्याय हे ज्ञानविज्ञानप्रधान आहेत.
टिळकांच्या गीतेवरील टीकेचे वेगळेपण असे की ते स्वत: गणिती, तर्कवेत्ते आणि ‘अ-कवी’ होते. त्या मुळे प्रत्येक मुद्दा हा तर्कावर घासून, देशी, विदेशी संदर्भांचा साधकबाधक विचार करून, प्रत्येक विधानाला संदर्भ देत, रोखठोक गद्यस्वरूपात मांडण्यात आला आहे.
मला सुद्धा गीतेतील अध्याय पाठ करताना आणि त्याचे विविध ठिकाणचे उल्लेख वाचताना काही प्रश्न पडायचे. अशा प्रश्नांवर विचार करताना मनांत एक संशय यायचा. आपल्याला एखाद्या विषयातील काहीही समजत नसताना, त्या विषयाचा खोलात अभ्यास नसताना, प्रश्न पडणे तरी बरोबर आहे का ? दोन गंमतशीर गोष्टींमुळे हा गोंधळ संपला.
पुलंच्या ‘असा मी, असामी’ मधे एका प्रकरणात पुलंनी (बहुतेक ज्ञानेश्वरांची) एक ओवी उधृत केली आहे.
राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे।
म्हणोन काय कवणे, चालोचि नये॥
आणि दुसरा प्रसंग म्हणजे, डॅा. बी. एम्. हेगडे यांचे लेक्चर होते तेव्हाचा. त्यांनी लेक्चर संपल्यावर विचारले की, कुणाला काही प्रश्न आहेत का?
बहुतेक वेळा, वक्ते या प्रश्नानंतर ठराविक विनोद करतात. ‘ज्या अर्थी प्रश्न नाहीत त्या अर्थी विषय पूर्ण कळला किंवा काहीच कळला नाही’. डॅा. हेगड्यांनी सगळ्यांकडे पहात सांगितले, ‘Please don’t feel shy to ask questions. Remember, there are nothing like stupid questions, only stupids don’t ask questions’.
या दोन गोष्टी डोक्यात राहिल्या आणि मग माझे प्रश्न मी विचारू लागलो.
१) कृष्णानी गीता अर्जुनाला सांगितली त्या मागे काही का कारण असेना पण ती वाचून, समजून घेउन ती लोकांना सांगावी असे शंकराचार्यांपासून ते ज्ञानेश्वरांपर्यंत अनेकांना का वाटले असेल?
पहिल्या भागात मी लिहिले होते की बारावा अध्याय पाठ का करायचा या प्रश्नांला आईने उत्तर दिले होते “त्यामुळे पाठांतराची सवय लागते, उच्चार स्पष्ट होतात”.
त्या त्या काळातही पाठांतर, शब्दोच्चार सुधारणे वगैरे जमविण्यासाठी कितीतरी स्तोत्र, काव्य, टंग ट्विस्टर्स आणि मेमरी एनहान्सिंग टेक्नीक्स असतीलच की. मग दोन हजार किंवा पाच हजार वर्षांपूर्वीची गीता लोकांपर्यंत पोचावी म्हणून एवढ्या लोकांनी का प्रयत्न केले?
२) स्वत: समजावून घेतली ठीक आहे. त्याचा काय अर्थ घ्यायचा तो घेतला. त्याचा व्यवहारात काय वापर झाला? ते कुठे नोंदवून ठेवले आहे का?
प्रश्न पडणे, तो नोंदवून ठेवून त्यावर मनन करून त्यावरून निष्कर्ष काढणे, ते प्रयोगाने सिद्ध करणे. या प्रयोगांतून नवीन प्रश्न निर्माण होणे हे घडताना आपण बघितले आहे.
कोपर्निकस ते न्यूटन ते आईन्स्टाईन यांनाही प्रश्न पडलेच. त्यांनी ते लिहून ठेवले त्यातून भौतीकशास्त्र प्रगत होत गेले. त्याने सृष्टीच्या निर्मितीसंबंधी, तिच्या व्यवहारासंबंधी पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत गेली. त्याचे व्यवहारात अनेक उपयोग होत गेले. तीच गोष्ट जीवशास्त्र, रसायनशास्त्र किंवा विविध ज्ञानशाखांची. प्रश्नांच्या विविधतेनुसार वेगवेगळी शास्त्र डेव्हलप होत गेली. त्यात एका प्रश्नाच्या उत्तरातून वेगळ्या पातळींवर नेणारे नवीन प्रश्न निर्माण झाले. त्यातून क्वांटम थियरीचा जन्म झाला. पुढची पायरी म्हणजे ‘युनिफाईड थियरी’ आणि स्टीफन हॅाकिंगच्या कल्पनेतील ‘थिअरी ॲाफ एव्हरिथिंग’. असा गीता आणि त्यावरील टीकाग्रंथ यांचा प्रॅक्टिकल वापर झाल्याच्या नोंदी कुठे आहेत का ? गीता डेव्हलप होत गेली का ?
३) विचार, निरीक्षण, निष्कर्ष आणि नोंदी हे करताना मूळ उद्देश काय असतो? सभोवताली असलेल्या आणि घडणाऱ्या गोष्टींचे काही नियम आहेत की त्या रॅंडमली घडत आहेत? घडणाऱ्या गोष्टींना काही कार्यकारणभाव किंवा cause effect relationship आहे का ? हाच सर्व शोधांमागचा, विचारांमागचा मूळ प्रश्न असतो का? असा मला प्रश्न पडे.
४) या मूळ प्रश्नाचे उत्तर शोधण्यास गीता मदत करते का ?
या प्रश्नांवर विचार करताना गीतरामायणातील एक ओळ आठवली
‘पुरषार्थाची चारी चौकट, त्यात पाहता निज जीवनपट’
त्या वरून मग आठवले की माणूस धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पातळ्यांवर जगत असतो. यातील सर्व पातळ्या सारख्याच महत्वाच्या आहेत. यातील अर्थ आणि काम या बद्दलचे नियम कालानुरूप वेगवेगळ्या प्रकारे बदलत असतात. त्या बद्दल गीता काही जास्त बोलत नाही. धर्म आणि मोक्ष यांबद्दल गीता बोलते.
धर्म म्हणजे वागण्याचे नियम. कायदा, घटना या देशकालनुरूप बदलतात पण धर्म म्हणजे माणसांना पिढ्यानपिढ्या धरून ठेवून बहुतेकांचे कल्याण करणारे नितीनियम. मोक्ष म्हणजे जगत असताना अनाकलनीय वाटणाऱ्या वेदनांचे काल्पनिक कार्यकारण आणि यातून सुटण्याचा दिलासा.
गीता ही ‘धर्म’ आणि ‘मोक्ष’ या बद्दल बोलते. हे जीवनाचे विभागही अर्थ आणि काम इतकेच किंवा जास्त महत्त्वाचे आहेत. शंकराचार्य ते ज्ञानेश्वर या सर्वांना या संबंधात विचार करताना गीतेत उत्तरे सापडली असावीत. त्यांना सापडलेली उत्तरे इतकी चपखल होती की ती इतरांनाही सांगावी म्हणून अनेकांनी त्यांवर टीकाग्रंथ लिहिले, भाषांतरे केली. पण तरी एक प्रश्न उरतोच.
गीता जाणून घेण्याचे आजच्या काळातील काय प्रयोजन ?
ते गीताआजीला विचारू.
©नितीन पाटणकर