गीता आजीच्या गोष्टी – ४

गीताजयंतीला पहिला भाग लिहिला. आज अटलजींच्या जयंतीला हा भाग लिहितोय. अटलजींच्या वागण्याचा संदर्भ आहे या भागात.

गीता आजीच्या गोष्टी भाग ३ मध्ये आपण पहिले की गीते संबंधात मूळ प्रश्न हा “गीता, आजच्या काळात वाचून, समजावून घेऊन काय फायदा? गीतेसारख्या पुस्तकांचे आजच्या काळात स्थान काय?” किंवा “गीता वाचून आपल्या कुठच्या समस्यांवर उपाय सापडणार आहेत?, कुठचे प्रश्न सुटणार आहेत? अशा स्वरूपाचा आहे.

या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी आपल्याला नक्की प्रश्न कोणते आहेत?, आपल्या समस्या नक्की कोणत्या आहेत हे समजून घ्यायला हवे.
आपल्याला समस्यां असतात म्हणजे कोणाला असतात ? याचे अगदी बाळबोध उत्तर म्हणजे ‘जगणाऱ्या माणसांना’ समस्यां असतात.
सगळ्यांना माहीत आहे की कोणीही अमरत्वाचा पट्टा घेऊन जन्माला आलेले नाही. समजू लागल्यानंतर हे कळू लागते की शेवटी सगळ्यांना मारायचे आहे आणि सर्वकाही इथेच ठेवून जायचे आहे. हा शेवट जर ठरलेला आहे तर माणूस का जगतो ? जगतो म्हणून समस्यां आहेत. समस्यां नको असतात म्हणून उपाय शोधले जातात. मग मूळ समस्येचे जे कारण, ‘जगणे’ त्याचेच निराकरण का करीत नाही कोणी? ‘न राहेगा बास, न रहेगी बासुरी’ असे लक्षात घेऊन माणसे का जगणे सोडून देत नाहीत? नैराश्यग्रस्त होउन कुणी आत्महत्या करतो पण हा अपवाद आहे. आधुनिक काळात याला अपराध समजतात.

तेव्हा माणूस का जगतो याचा विचार केला पाहिजे. जगत रहायला हवे ही उपजत किंवा अगदी मूळ प्रवृत्ती आहे. या मूळ प्रवृत्तीला ‘समाधान’ असे म्हणतां येईल. या समाधानाच्या जोडीने ‘सूख’ आणि ‘आशा’ या कल्पना जिवासवे जन्माला येतात. गदिमा गीतरामायणात लिहून जातात, ‘जिवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्मजात’. या जिवासवे जन्मणाऱ्या मृत्यूच्या सोबतच‘सुख मिळविण्याची आशा आणि ते मिळाल्याचे समाधान’ या गोष्टीही जन्माला येतात.

सुख आणि समाधान हे मिळविणे आणि जिवंत राहणे या दोन गोष्टींमधेच समस्यांचे मूळ दडलेले आहे.
‘सेपिअन्स’ या युवान नोआ हरारीच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे जिवंत राहण्यासाठी गट करून राहणे ही सर्व प्राणिमात्रांची गरज आहे. आपण म्हणजे ‘होमो सेपिअन्स’ (याचा अर्थ शहाणा माणूस) हा इतर माणसांच्या जसा की ‘होमो निएंडरथल’ यांच्या पेक्षा शारिरीक क्षमतेत, मेंदूच्या आकारात सर्व बाबतीत दुय्यम होता. जो पर्यंत निएंडरथल आणि सेपिअन्स यांची गटसंख्या १५० ते ५०० पर्यंत मर्यादित होती तो पर्यंत निएंडरथल वरचढ होते.

अशी एक युक्ती सेपिअन्सना सापडली की ज्या मुळे सेपिअन्सची गटसंख्या ५०० वर न राहता ती हजारो पर्यंत जाउ शकली. या राक्षसी गटसंख्येमुळे सेपिअन्सनी कदाचित इतर मानवांना संपवले आणि मानव जातीत एकमेव जात उरली ती म्हणजे सेपिअन्स.

ही युक्ती कुठची तर अन्न, सुरक्षा आणि मैथून या गरजांमुळे आणि गरजांसाठी बांधले जाणाऱ्या गटांसोबत एक वेगळाच गोंद त्यांनी तयार केला. हरारी म्हणतो की हा गोंद म्हणजे काल्पनिक पण आपल्याला जोडणाऱ्या कथा. त्या कथा या देव-देवता, राक्षस, भूतेखेते यांच्यावर आधारित होत्या. या कथा अंगिकारल्यामुळे हजारो माणसांचे गट तयार होउ लागले. त्यातूनच पुढे ही गटसंख्या वाढवून, पुष्कळांचे पुष्कळ सूख ही कल्पना साकार करणारे काही नितीनियम उदयाला आले. त्यालाच धर्म म्हणतात. धर्माचा उदय झाल्यानंतर हजारो ऐवजी लाखोंचे गट तयार होउन नांदू लागले.

पुष्कळांचे पुष्कळ सूख ही कल्पना जशी रुजली तेव्हा माणसाला अजून एक साक्षात्कार झाला. गटातील व्यवहाराचे नियम हे क्षणिक ते दीर्घकालीन पण एक ते दोन पिढ्यांच्या स्वार्थसाधनेवर बेतलेले होते. धर्मातील व्यवहाराचे नियम मात्र पुष्कळांचे पुष्कळ सूख ही कल्पना घेउन अनेक पिढ्यांना विचारात घेणारे होते. धर्माचे नियम पाळताना अनेकदा निसर्गदत्त ताकदवान माणसे स्वार्थासाठी धर्माचे नियम मोडीत किंवा त्याला वाकवीत, त्याला हवे ते रूप देत. गटाच्या नियमांत अल्फा मेल किंवा अल्फा फीमेल यांची वागणूक कधीकधी तशीच असे. यांत काही नवल नव्हते. धर्माचे नियम स्वार्थासाठी वाकवणे यांत आश्चर्य नसले तरी पुष्कळांच्या सुखासाठी, किंवा पुढील पिढ्यांच्या सुखासाठी; स्वत:चे सूख त्यागणे, स्वत: दु:ख कष्ट भोगणे असे करणारी माणसेही सापडत होती हे मोठे आश्चर्य होते. इथे माणसांना, स्वार्थाच्या विरुद्ध दया, क्षमा, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, दान या व्यवहारांची ओळख झाली. अनेक पिढ्यांनंतर स्वार्थविपरित व्यवहार करणाऱ्या माणसांमुळे पुष्कळांचे पुष्कळ सूख हे धर्माचे उद्दिष्ट जास्त सफल होते हे जाणवले आणि माणसांमधे स्वार्थपरायण व्यवाहारांच्या पेक्षा स्वतंत्र अस्तित्व असलेले स्वार्थ न साधणारे व्यवहारही असतात हे लक्षात आले. अशा व्यवहाराचे दीर्घकालिक परिणाम बघून त्यांना गुण असे संबोधन मिळाले. असे गुण फार वापरायला लागू नयेत असा व्यवहार ठेवणे याला नितीमत्ता म्हणायला सुरवात झाली. ही नितिमत्वाची व्याख्या खूप महत्वाची आहे. धर्माचे नियम हे सुद्धा माणसाचा स्वधर्म किंवा वैयक्तिक धर्म (आचरण), अर्थ (विनिमयासाठी लागणारी साधन संपत्ती गोळा करणे आणि अदलाबदल), काम ( desires ) यांमधे सर्व क्षेत्रात नितिमत्ता असावी अशा अर्थाने घडत गेले.
नितिमत्ता साधताना धर्माचे नियम आणि दीर्घकालिक पुष्कळांच्या पुष्कळ सुखासाठी व्यवहाराचा समतोल हे ही धर्म यांच सदरात मोडते.

मानवाच्या इतिहासात काही गटांनी गुणांचा अतिरेक केल्याने इतर गटांनी त्यांना संपवून टाकण्याचा प्रयत्न केल्याची अनेक उदाहरणे आहेत. गटांनी संख्याबळावर किंवा शस्त्रबळावर सेपिअन्सचेच काही गट नष्ट केल्याचेही दाखले आहेत.

या सगळ्या गोष्टी लक्षात घेउन, ‘आजच्या काळातील समस्या काय’ या प्रश्नाचे उत्तर शोधूया. उत्तर अगदी सोपे आहे. आजच्या काळातील बहुतेक समस्या या नितीमत्ता गुंडाळून ठेवल्यामुळे, किंवा स्वार्थसाधनासाठी नितीमत्तेलाच वाकविण्यामुळे आणि गुण असणे हाच दोष किंवा कमजोरी मानल्यामुळे निर्माण झाले आहेत.

नीतीनुसार वागताना अनेकदा नक्की कसे वागावे हे कळत नाही. वैयक्तिक, तात्कालिक किंवा कालातीत धर्मपालन यांत संभ्रम किंवा विरोधाभास असू शकतो. त्या विरोधाभासाततून योग्य वाट दाखवणारी उत्तरे गीताआजी देते.

पण…. नीतीनुसार वागायला हवे, प्रत्येकातील गूणांना मान द्यायला; त्यातच दीर्घकालिक फायदा आहे हे वैयक्तिक पातळीवर पटायला हवे. अशी गरज असते हेच मुळी आपल्याला कधी शिकविले जात नाही की ती गरज व्यवहारात दिसत नाही.

नीती सोडून वागले तर वागणाऱ्याचे नुकसान होत नाही पण गटाचे नुकसान होते. हे शिकविणारे नीतीशिक्षण संस्कारक्षम वयात द्यायला हवे. असे वागणाऱ्याला सुखापासून वंचित रहावे लागते हे ही समोर यायला हवे. ही जबाबदारी मात्र त्या गटाची असते.

एके काळी, पाप-पुण्य, मोक्ष, कर्मफल अशा अनेक कल्पनांमधून हे शिक्षण मिळत असे. या कल्पनांचा अतिरेक आणि नंतर या कल्पना पूर्ण नाकारणे या मुळे चंगळवाद वाढला एवढेच नाही तर नितिमत्तेचा ऱ्हास झाला.

हा ऱ्हास झाला, यातून गटाचेच नुकसान होत आहे हे कसे पटवून द्यायचे ही आजची समस्या आहे.
नीतीने वागण्याची गरज आहे यांवर विश्वास बसला तर त्यातील बारकावे, त्याची व्याप्ती, वेगवेगळ्या प्रसंगात नीतीची व्याप्ती आणि व्याख्या काय हे गीताआजी नक्की सांगते.
पुढच्या लेखातून प्रत्यक्ष गीतेतील अध्यायातील काही उदाहरणे बघू.

©नितीन पाटणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X