गीता आजी सांगते, जगात चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे लोक असतात. विचारी आणि अविचारी लोक असतात. अशा मिश्र जगात चांगल्या लोकांना मी गोष्टी सांगते. वाईट माणसे माझ्या गोष्टी ऐकायला येताच नाहीत. तर माझ्या गोष्टींचा आजच्या काळात कुठे उपयोग होउ शकतो तेसमजून घेण्यासाठी काही गोष्टी गृहित धराव्या लागतात. मान्य असाव्या लागतात. हे नीट लक्षात घे तर तुला पुढील गोष्टीचे सार कळेल.
१) दु:ख नाही ते सूख असे नसून सुख आणि दु:ख या दोन स्वतंत्र संवेदना आहेत.
२) प्रत्येक व्यवहार हा मुळात स्वार्थसाधनासाठी असतो आणि दीर्घकालिक सुखासाठी तात्कालिक त्याग, दया वगैरे सद्गुण दिसतात; असे नसून स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही उपजत गोष्टी आहेत. दया, क्षमा, शांती, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह इत्यादी व्यवहार हे सुद्धा नैसर्गिक किंवा उपजत आहेत.
३) स्वार्थ आणि परमार्थ यांचा अतिरेक होउ न देतां ‘पुष्कळांचे पुष्कळ सूख’ हे सूत्र अनेक पिढ्यांसाठी उपयोगी पडावे म्हणून घ्यायचे निर्णय म्हणजे नितीमत्ता आणि धर्म
४) स्वधर्म, अर्थ, काम या सोबत मोक्ष या चौकटीत माणसाचे जीवन व्यतीत होते. त्यातील अर्थ आणि काम या साधताना धर्मानुसार वागणे नसल्यास, तसे वागणाऱ्यास कदाचित काहीच नुकसान होत नाही किंवा शिक्षा होत नाही पण त्याचे परिणाम अनेकांना किंवा अनेक पिढ्यांना भोगायला लागतात. त्या परिणामांना आटोक्यात ठेवण्यासाठी मोक्ष ही कल्पना सुचली असावी.
५) बौद्धिक, शारिरीक, आर्थिक ताकद जितकी जास्त तितका जास्त विश्वास धर्मावर आणि नितिमत्तेवर आणि त्याच्या परिणामांवर असायला हवा. Great power comes with great responsibility हे वाक्य तीच भावना व्यक्त करते. तसे नसल्यास, नितीमत्तेचा ऱ्हास होउन अनेक सामाजिक त्रास उद्भवतात.
६) नितीमत्तेचा ऱ्हास हीच आजच्या काळाची समस्या आहे
७) नितीमत्तेची गरज लहान वयापासून, प्राथमिक गरज म्हणून मनावर बिंबवली गेली तरच यांवर उपाय सापडतील.
८) जगात बहुतेक लोकांत गूण आणि अवगूण असतात, पण काही लोक जास्त सुष्ट असतात तसेच काही लोक हे जास्त दुष्ट असतात. क्वचित पूर्ण गुणी किंवा पूर्ण दुर्गुणी माणसेही
सापडतात. अनेकदा यांचा दुष्ट व्यवहार घातक असतो. ते कुठच्या परिस्थितीने दुष्ट झाले हे विचार करीत बसण्यास वेळ नसतो. अशा वेळेस या दुष्टांशी सुष्टांचा व्यवहार कसा असावा याचे सुष्टांना मार्गदर्शन लागते.
९) दुष्ट व्यवहार टाळण्यासाठी पाप, पुण्य यांची होणारी फलनिष्पत्ती, आणि मोक्ष यांची कल्पना मनावर ठसवली आहे. पाप केल्याने काय नुकसान होते, किंवा ते खरेच होते का, याचा व्यवहारात फारसा प्रत्यय येत नाही. बरेचदा पापी माणसाला स्वत:ला काहीच शिक्षा होत नाही. त्याच्या पापाची फळे इतर लोक आणि पुढील पिढ्या (यांत त्यांच माणसाच्या पुढील पिढ्या असा अर्थ नाही तर एकूणच मानवजात असा अर्थ आहे) भोगतात. म्हणून तर पापाची पुढील जन्मात शिक्षा किंवा स्वर्ग-नर्क या कल्पना आल्या. त्या कल्पनांचाच स्वार्थासाठी दुरुपयोग झाल्याने त्या कल्पनाच त्यागल्या गेल्या. त्या मुळे नितीमत्तेचा अनिर्बंध ऱ्हास होत राहिला.
१०) नितीमान असण्याची गरज कशी निर्माण करायची ही तुमची जबाबदारी आहे.
ही गरज जर निर्माण झाली तर…..
नीतीने वागताना अनेक प्रसंगात नियमांच्या तात्कालिक अपवादाचा प्रश्न येतो. तेव्हा काय करावे? याचे मार्गदर्शन माझ्या गोष्टी करतील.
वरील गोष्टी लक्षात ठेवून गीतेतील पहिला अध्याय – अर्जुनविषादयोग बघू
©नितीन पाटणकर