गीता आजीच्या गोष्टी – ६

धृतराष्ट्र उवाच

गीतेतील पहिल्या अध्यायाची सुरवात ही ‘धृतराष्ट्र उवाच’ अशी होते. मला नेहमी प्रश्न पडायचा की गीतेची सुरवात ही धृतराष्ट्र उवाच अशी का केली असावी? त्याचे गीता आजीने मला दिलेले उत्तर मी सांगतो. इतर कोणाला गीता आजी कदाचित वेगळे उत्तर देईल.

धृतराष्ट्र हा राजा आहे. युद्ध टाळायची इच्छा असती तर त्याचा हुकुम पुरेसा होता. दुर्योधन कितीही ताकदवान असला तरी राजाच्या हुकमाची अंमलबजावणी करायला भीष्म, द्रोण पुरेसे होते. त्यांची निष्ठा राजाच्या आणि राज्याच्या पायाशी बांधली गेली होती. राजनिष्ठा आणि सोबत येणारे आर्थिक मिंधेपण हा दुहेरी प्रभाव त्यांना धृतराष्ट्राशी बांधून ठेवत होता. पांडवांची बाजू ही त्या काळातील नितिधर्मानुसार योग्य होती. भीष्म द्रोणांना राजनिष्ठा की न्याय यांत एकाची निवड करायची होती. त्यांनी राजनिष्ठेची निवड केली. आपल्या हातून, अन्याय्य बाजूने लढून; न्याय्य बाजूने लढणाऱ्या अनेकांचा संहार होणार आहे हे त्यांना कळत होते. तरीही कुठच्याही द्वंद्वात न सापडता त्यांनी कौरवांच्या बाजूने युद्धात नरसंहार करायचे स्वीकारले होते.
‘पुष्कळांचे पुष्कळ सूख’ आणि अनेक पिढ्यांचा विचार हे जे धर्माचे सूत्र आणि न्यायअन्याय, नितीमत्ता आणि योग्य अयोग्य या गोष्टीतील द्वंद्व त्यांच्या वागण्यात दिसून येत नाही. महाभारतातील वर्णनानुसार कौरवांकडे अकरा अक्षौहिणी सैन्य होते तर पांडवांकडे सात अक्षौहिणी. पुष्कळांचे पुष्कळ सूख हाच जर नियम विचारात घेतला तर जिथे जास्त माणसे त्या बाजूने उभे राहण्यात गैर काहीच नाही. राजनिष्ठा, अर्थनिष्ठा, हे नियमसुद्धा भीष्मद्रोणांच्या निर्णयासाठी महत्त्वाचे होते. त्यापुढे त्यांनी न्यायअन्याय, नितीमत्ता आणि योग्य अयोग्य या गोष्टी दुय्यम मानल्या.

कोर्टात केस लढताना कायद्याच्या कलमांमधे जर द्विधा स्थिती असेल तर पूर्वीच्या न्यायाधिशांनी अशा स्थितीत काय निर्णय दिला हे सांगितले जाते. याला ‘प्रिसिडन्स’ म्हणतात. त्या मुळे अशा स्थितीत निर्णय देणाऱ्यावर त्या खटल्यापुरतीच नाही तर पुढील अनेक पिढ्यांच्या न्यायनिवाड्याला वळण देण्याची जबाबदारी असते.
कदाचित कौरवांच्या बाजूने इतके जास्त लोक युद्धासाठी तयार होण्यामागे, भीष्मद्रोणांचा ‘कौरवांच्या बाजूने लढण्याचा निर्णय’ हे सुद्धा कारण असेल. ते करतील तोच धर्म असे मानणारे अनेक जण असतीलच त्या काळात. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप व्यापक होती. या दृष्टीने बघितले तर भीष्म द्रोण यानी या सर्व गोष्टीना दृष्टीआड ठेवल्यामुळे एकप्रकारे त्यांनी हे आंधळेपण स्वीकारले होते असे म्हणता येईल.

युद्ध हा क्षत्रीयाचा धर्म आहे. युद्धात मरण आले तर स्वर्गप्राप्ती होते. क्षत्रीयासाठी युद्ध ही स्वर्गप्रप्तीची अलौकिक संधी आहे. असे अनेक उल्लेख गीतेत आहेत. कृष्ण अर्जुनाला उपदेश करताना ही वाक्य आली आहेत. भीष्म द्रोणांनी तो विचार अंगीकारून योग्य अयोग्य हा निर्णय राजावर सोडून दिला होता. त्या मुळे धृतराष्ट्राची जबाबदारी अजूनच जास्त होती. त्याने कृष्णशिष्टाईला मान्यता दिली असती तर त्याला दुर्योधनाचा विरोध सहज मोडून काढतां आला असतां.

आपला वंश पुढे राजपदावर राहवा या मोहापोटी तो आंधळा झाला होता. दृष्टीने आंधळा असला तरी त्याला योग्य अयोग्य, निती धर्म यांची जाण होतीच. दुर्योधनाच्या स्वार्थापेक्षाही धृतराष्ट्राचा हा मोह जास्त बलवान होता. युद्ध झालेच तर कुलक्षयही होउ शकतो याचीही जाणीव होती त्याला. तरीही त्याने युद्ध थांबविण्यासाठी काहीही केले नाही.
राजा किंवा नेता हा घेतलेल्या निर्णयांच्या परिणामांना जबाबदार असतो इतकेच नव्हे तर ‘न’ घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांनाही जबाबदार असतो.

युद्ध तर चालू होणार, भीष्म द्रोण असताना आपणच युद्ध जिंकणार, दुर्योधन राजा होणार याची खात्री असूनही, हे युद्ध अन्याय करणारे असल्याने नियती काही वेगळाच डाव तर रचणार नाही ना या शंकेने ग्रस्त होउन त्याला युद्धात काय घडते आहे हे बघण्याची उत्सुकता होती. असे म्हणतात की व्यासांनी येउन, “तुला युद्ध बघायचे असल तर मी तुला दृष्टी देतो” असे विचारल्यावर ते नाकारून ती दृष्टी संजयाला देवविली. स्वत:च्या निर्णयाचे परिणाम बघण्याचे धाडसही त्याने दाखवले नाही. तरीही युद्धाची साद्यंत हकीकत सेवकाकडून फक्त ऐकून घ्यायला मात्र तो तयार झाला. इथेपण त्यांने आंधळेपण पसंत केले. प्रत्यक्ष बघणे आणि ऐकीव माहिती या मधे त्याने ऐकीव माहितीला प्राधान्य दिले.

या युद्धात उतरणारे सर्वजण दीर्घकालीन परिणाम ठाऊक असूनही युद्ध करायला तयार झाले. त्यांनीही अंतिम आणि दीर्घकालीन परिणामांकडे कानाडोळा केला म्हणज त्यांनीपण एकप्रकारे आंधळेपण स्वीकारले होते. या सर्वांचे आंधळेपण असा शब्दप्रयोग अशासाठी केला आहे की या गोष्टींवर विचार न करताच त्यांनी युद्धाची वाट धरली. यात वाईट किंवा चांगले असे काहीच नाही. धर्म किंवा नितीनियम यांचा किती खोलात विचार करायचा किंवा किती पातळ्यांवर विचार करायचा हे कसे ठरवायचे, कोणी ठरवायचे? या परिणामांची जबाबदारी कोणाची?
थोडे विषयांतर करून सांगायला हवे की ज्याच्यात दूरगामी आणि शुभंकर किंवा भयंकर परिणाम घडविण्याची शक्ती असते त्याने सर्वात जास्त विचार करून, सर्व पातळ्यांवर विचार करून मग निर्णय घ्यायला हवा. म्हणूनच धर्म या कल्पनेचा विचार आणि विस्तार क्षत्रियांनी सर्वात जास्त केला. राम, कृष्ण हे क्षत्रिय होते. अर्जुन क्षत्रिय होता. व्यास, वाल्मिकी, विश्वामित्र हे क्षत्रिय होते. त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव होती. त्यांच्या कृत्याचे परिणाम सर्व समाजावर होतात हे त्यांना माहित होते म्हणून तर त्यांनी धर्म आणि नीतिमत्तेचा सर्वात जास्त विचार केला. तसे म्हटले तर विष्णू हा क्षत्रिय आहे. अगदी अर्वाचीन इतिहासात देखील, राजे लोकांनी धर्म स्वीकारले, आणि धर्म वाढवले. अशोक, बुद्ध ते कॉन्स्टंटाईन हे क्षत्रिय होते. त्यांनीच नीतिमत्ता ठरवली, स्वीकारली आणि त्यांचे वर्तन हे धर्मवर्तन झाले.

धर्माचे सार समजून न घेता धर्माचे नियम आंधळेपणे पाळणाऱ्या किंवा त्याकडे न बघण्यामुळे अंध झालेल्या अशा प्रवृत्तीचे परिणाम म्हणजे महाभारत. अशा प्रसंगात; अलग अलग प्रसंगात अगदी योग्य असलेले नियम एकमेकांना छेद देतात. अशा वेळेस व्यक्तिगत नव्हे तर समाजाला भविष्यातही धरून ठेवू शकतील अशा नियमांचा किंवा नियमांच्या अपवादांचा आधार कसा घ्यावा आणि स्वात:च्या कृतीबद्दलचा संभ्रम आणि त्यातून निर्माण होणारे मानसिक तणाव कसे टाळायचे हे सांगते भगवद्गीता.
म्हणून गीतेची सुरवात या सर्व अंधत्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या धृतराष्ट्राच्या प्रश्नातून होते.

©नितीन पाटणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X