गीता आजीच्या गोष्टी – ७

अठरा अध्यायांच्या गीतेत पहिला अध्याय हा फार वेगळा आहे. यात धृतराष्ट्र संजयच्या मुखातून युद्धभूमीवर काय घडले आहे ते जाणून घेतो आहे अशी सुरवात आहे. धृतराष्ट्र हे अनेकपदरी अंधत्वाचे प्रतीक आहे हे गेल्या लेखात पाहिले आपण.

सुरवातीच्या २५ श्लोकात काय वर्णन आहे ? युद्धासाठी कोण कोण जमलेले आहे, कोणती व्यूहरचना आहे, कोणाचे कुठचे शंख आहेत आणि बाकी वर्णन आहे. हे एक वर्णन सोडले तर पुढे संपूर्ण गीतेत कुठेही युद्धाचे वर्णन नाही. एवढी वातावरण निर्मिती करायची काय गरज असावी? सुरवातच
अर्जुन उवाच
‘सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापाय मे sच्युत’
अशी करता आली असती.

मी गीता आजीला हाच प्रश्न विचारला. तिने मला दिलेले उत्तर असे.
त्या काळातील नीतिमत्ता आणि नियम याची कल्पना यावी हा एक उद्देश आहे. युद्धाचा दिवस ठरला, वेळ ठरली. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत युद्ध हा नियम ठरला. सर्व जण आपापल्या जागी सज्ज आहेत. धर्मराजाने पुढे जाऊन भीष्म द्रोणांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. धर्माला आशीर्वाद दिल्याबद्दल दुर्योधनानेही आक्षेप नोंदविला नाही. रणभेरी वाजल्या, शंखनाद झाला आणि आता युद्ध चालू होणार इतक्यात अर्जुनाने दोन सैन्यांच्यामध्ये रथ उभा केला आणि सभोवार बघून खाली बसला. हे बघून युद्ध चालू करायचे थांबवून दोन्ही सैन्य उभी राहिली. युद्धाचेही तेंव्हाही नियम होते.

आत्ता नाही का ‘जिनेव्हा कन्व्हेन्शन’ आहे, बायॉलॉजिकल आणि केमिकल वॉर संबंधी नियम आहेत, तसे त्या काळातील वेळांचे नियम होते.
प्रत्येक काळातील नीतिनियम हे पुष्कळांचे पुष्कळ सुख, आणि अनेक पिढ्यांपर्यंत समाज बांधलेला राहावा म्हणून बनलेले असतात. म्हणून वेगवेगळ्या काळातील; बहुपत्नीत्व किंवा बहुपतित्व, मातृसत्ताक किंवा पितृसत्ताक असे अनेक नियम एकमेकांशी तोलून त्यात बरेवाईट ठरविता येत नाही.

हे सर्व योद्धे आणि त्यांचे वर्णन करण्याचे जास्त महत्वाचे कारण म्हणजे प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली की अर्जुनाला पडलेला संभ्रम कुणालाही पडू शकतो हे ठसविणे. यात धर्म आणि नीतिनियमांची चाड असलेल्या क्षत्रियाचे वर्णन आहे. युद्ध होणार हे ठाऊक आहे, युद्धात कोणकोण आहेत हे ठाऊक आहे, सर्व व्यूह मानत आहेत. स्ट्रेंग्थ, विकनेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट (SWOT) ऍनालिसिस झाला आहे. ही सर्व तयारी असूनही प्रत्यक्ष युद्धाला सुरवात होण्याआधी अर्जुनाला, ‘पुन्हा एकदा पाहून घेतो, कोण आहे युद्ध करायला ते’ असे का वाटले असावे.
सर्व परिणामांची माहिती असताना, आपण करतोय ते योग्य आहेत हे शेवटच्या क्षणी पुन्हा तपासणे हे नीतिमान क्षत्रियाचे लक्षण आहे की अतिलक्षण? . सामर्थ्य आहे, माहिती आहे, तरीही हा नीतिनियम पुन्हा पुन्हा पडताळण्याचा अट्टाहास ऐनवेळी माणसाला कमकुवत करू शकतो. ठरविणे आणि करणे यात एक क्षण असा येतो की आता विचार पुरे आणि कृती हवी, तिथेच चांगला माणूस कच खाण्याची शक्यता असते. विचाराने ठरविलेल्या अपरिहार्य गोष्टी प्रत्यक्ष समोर दिसल्या की त्याबद्दल संशय निर्माण होऊ शकतो. तेंव्हा विचार पक्का झाला की कृती चालू करा. कृती करण्याचा क्षण ठरविण्यासाठी शक्य असेल तितका वेळ घ्या. जमेल तेवढा विचार करा पण कृती करण्याचा क्षण चुकवू नका.

एकदा का हा मुहूर्त चुकला की मग ‘मन’ त्या कृतीऐवजी जास्त योग्य कृती कोणती, करतोय ती कृतीच अयोग्य आहे, त्याला इतर अनेक मार्ग आहेत इत्यादी फाटे फोडते. मग आपण भरकटून जातो, भांबावतो आणि नको ते करून बसतो.

गीता आजी सांगते की अर्जुनाने काय योजले होते ते प्रत्यक्ष पाहताना स्वसंशय व्यक्त केला आणि तिथून त्याला आँक्साइटीने ग्रासले. त्यचे वर्णन
‘सीदन्ति मम गात्राणि … ‘
या श्लोकात आहे. त्यामुळे ठरवलेले कार्य तर थांबलेच पण त्याहीपेक्षा जास्त धोकादायक म्हणजे त्याला सन्यास घ्यावा वगैरे विचार मनात येऊ लागले. गीता आजी म्हणते की माणूस जितका चांगला आणि जितका हुशार तितका स्वसंशयी असू शकतो. एकदा का स्वसंशयाने ग्रासले की तो इतका भरकटतो की त्याला ‘ठरवलेली गोष्ट कर’ हे पटवून देताना अक्षरश: रक्त आटवावे लागते.

त्या काळात युद्धाचे नीतिनियम वेगळे होते म्हणून त्या काळात भर युद्धात कृष्णाला अर्जुनाचे सगळे संशय दूर करता आले, त्याचे पांडित्य किती अस्थानी आहे हे पटवून देता आले. सन्यास, भक्ती, ज्ञान अशा अनेक गोष्टींची तुझ्या भाषेत खुसपट काढली अर्जुनाने, पण कृष्णाने त्याला समर्पक उत्तरे देऊन युद्धाला उभे केलेच.
तेंव्हा विचार आणि प्रत्यक्ष दर्शन यात फरक असतो. प्रत्यक्ष वेळ आली आणि कृतीचा मुहूर्त चुकला की कसा गोंधळ उडतो ते लक्षात घे आणि तो गोंधळ टाळ, कृतीचा मुहूर्त चुकवू नये हेच पहिल्या अध्यायाचे सार आहे.

©नितीन पाटणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X