गीतेची सुरवात धृतराष्ट्र करतो, ते का ; हे आपण पहिले. तसेच विचार, प्लँनिंग आणि प्रत्यक्ष कृती यातील कृतीचा मुहूर्त चुकला तर आँक्साइटी आणि पॅनिक सिच्युएशन कशी निर्माण होते ते पहिले.
गीता आजी पुन्हा पुन्हा एक गोष्ट सतत सांगते की जगात चांगले आणि वाईट असे दोन्ही लोक असतात. पुष्कळांचे पुष्कळ सुख आणि अनेक पिढ्यांपर्यंत समाजाला आणि एकूणच मानवाला एकत्र धरून ठेवेल असे वागणे म्हणजे नीती, न्याय आणि धर्मानुरूप आचरण.
स्वार्थासोबतही असे आचरण असावे असे वाटणारे लोक म्हणजे चांगले लोक. स्वार्थाला महत्व देणारे आणि नीती, न्याय, धर्माची फिकीर न करणारे म्हणजे दुष्ट किंवा वाईट लोक.
त्यामुळे नीती, न्याय आणि धर्माचे पालन करतानाच दुष्टांसोबतचा व्यवहार कसा असावा, हे प्रश्न फक्त चांगल्या लोकांनाच पडतात.
ज्याच्या अंगी जास्त सामर्थ्य अशा चांगल्या माणसाला हे प्रश्न जास्त पडतात. म्हणूनच अर्जुनाला असे प्रश्न पडले.
मी गीता आजीला एकदा विचारले, की भर युद्धात अठरा अध्याय सांगण्यामागे काय कारण होते? एवढा वेळ इतर लोक काय करीत होते ?
गीता आजी, मला जी उत्तरे देते; ती खास माझ्यासाठी असतात. ज्ञानेश्वर, लोकमान्य याना तिने फार गंभीरपणे उत्तरे दिली आहेत. ज्ञानेश्वरांना तिने काव्यात्म उत्तरे दिली तर लोकमान्यांना परखड आणि लॉजिकल. मला समजेल अशा संकल्पनात आणि सर्वसमावेशकता टाळून तिने उत्तरे दिली आहेत. कारण माझा मूळ प्रश्नच होता की, ‘गीता आजी आजच्या काळात तुझ्या गोष्टी लागू पडतात का ते सांग’ असा होता.
मी : एक श्लोक म्हणायला १० सेकंद लागतात असे गृहीत धरले तर ७०० श्लोक उच्चरायला निदान २ तास लागले असतील. युद्ध सुरु करण्याचे शंख वाजल्यानंतर दोन तास सर्व सैन्य थांबले होते ?
गीता आजी : का नसेल थांबले ? त्या काळात युद्ध कुठे करायचे, कधी करायचे हे ठरले होते. दोन सैन्यांच्या मध्ये थांबलेला रथ पाहून दोन्ही बाजूने धीर धरला असेल. आणखी एक विचार कर. तुला एक श्लोक म्हणायला १० सेकंद लागतात. हा समज ३जी स्पीड आहे आणि कृष्ण अर्जुनातील संवाद हा ५जी स्पीडने झाला असेल तर ? अजून एक गोष्ट. कृष्ण अर्जुन संवादाची फाईल संजयला मिळाली असेल. दिव्य दृष्टी म्हणजे हाय स्पीड हाय डेफिनिशन डेटा ट्रान्सफर. त्याने ते धृतराष्ट्राला ऐकवले किंवा वाचून दाखवले ते हे श्लोक असतील.
त्यामुळे तू मोजतोस तो वेळ हा संजयने धृतराष्ट्राला गीता वाचून दाखविण्याचा वेळ आहे.
मी: बर, तुझं म्हणणं मान्य केले तरी आता मला किंवा माझ्या लेकीला उपयोगी पडतील अशा गोष्टी मला सांग. आणखी एक उत्सुकता आहे. कृष्णाने अर्जुनाला एवढा सगळा फाफटपसारा का सांगितला?
गीता आजी : नक्की सांगते. पहिल्यांदा कृष्णाने जे काही सांगितले ते अर्जुनाच्या विविध शंकांचे निराकरण करण्यासाठी सांगितले. त्याला सांगता आले असते की, “गप्प बस. चुपचाप युद्ध कर. युद्ध जिंकलास की मग सांगीन”. पण त्या निमित्ताने अनेक गोष्टी त्याला सांगता आल्या. फाफटपसारा नव्हे तर जगात वागताना कसे वागावे याच्या अनेक गोष्टी कृष्णाने सांगितल्या आहेत.
मी: आजी , एखाद उदाहरण दे बघू .
गीता आजी: तू शाळेत पुस्तक वाचताना मधेच शेवटचे पान उघडून वाचायसास तसेच आपण करूया
मी : म्हणजे अठरावा अध्याय ?
गीता आजी: अख्खा अध्याय पण नाही. फक्त १४ वा श्लोक बघू.
अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथग्विधम् ।
विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम् ॥
अधिष्ठान म्हणजे जागा. तू म्हणतोस ना की उद्योग धंदा करायला जागा ही महत्वाची आहे. ऍक्सेसिबल लोकेशन किंवा अट्रॅक्टीव्ह डेस्टिनेशन असे जागेचे स्वरूप हवे. ऍक्सेसिबल ही क्रायटेरिया ही गिऱ्हाईकासाठी आणि ज्याला उद्योग करायचाय म्हणजे कर्त्यासाठी त्याच्यासाठीही ऍक्सेसिबल हवी. कर्ता हा दुसरा घटक. कर्ता म्हणजे जो उद्योग करायला तयार आहे, अनुभव, शिक्षण आणि रिस्क टेकिंगची तयारी आहे तो कर्ता. तिसरा घटक म्हणजे करण . म्हणजे साधन हत्यार किंवा तुझ्या भाषेत इक्विपमेंट आणि कच्चा माल, चवथा घटक म्हणजे पृथक चेष्टा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे केलेले प्रयत्न. त्याच चुका टाळून पण तर्कदृष्ट्या केलेले, यशस्वी होण्यासाठी आणि सतत दर्जा वाढावा म्हणून केलेले प्रयत्न. यातच इनोव्हेशन मॉडर्नायझेशन आले. आणि शेवटी दैव. म्हणजे नशीब.
मी: अग आजी हे मॅनेजमेंट आहे. कायझेन पण आहे.
गीता आजी : आता याच श्लोकाचा दुसरा अर्थ एक. अधिष्ठान म्हणजे जागा तसेच अधिष्ठान म्हणजे इंटेन्शन. अधिष्ठान म्हणजे निश्चय. काय करायचे ते नक्की ठरवले पाहिजे. बाकी पुढचे तीन घटक म्हणजे कर्ता, करण आणि पृथक चेष्टा हे मागच्यासारखेच. शेवटचा जो पाचवा घटक आहे दैव त्याचा बरेचदा चुकीचा अर्थ लावला जातो.
मी: तो कसा काय?
गीता आजी: दैव किंवा नशीब म्हटले की डोक्यात वाक्य येतात ना; नशिबात असेल तर मिळेल, असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी, नशीब गांडू तर काय करील पांडू. पण कृष्णाला हा अर्थ अभिप्रेत नव्हताच.
मी: मग ?
गीता आजी: त्याला म्हणायचं होते की विविधानो पृथक चेष्टा म्हणजे प्रयत्न करताना कितव्या प्रयत्नात यश मिळेल हे नशीब किंवा दैवावर अवलंबून असते. यश मिळणार हे नक्की.
मी : आयला! हे लक्षात ठेवायला हवे.
गीता आजी: याच श्लोकाचा अजून एक भाग तुला सांगते.
मी: अजून एक ?
गीता आजी: तो सर्वात महत्वाचा आहे. पण लक्षात यायला आणि स्वीकारायला कठीण आहे. अधिष्ठान, कर्ता या गोष्टींवर अती विचार केला तर गडबड होते. सभोवताली घडणारी आणि दिसणारी प्रत्येक गोष्ट जर आपण ‘त्या मागचे अधिष्ठान कोणाचे आणि कर्ता कोण’ हे शोधू लागलो तर त्याला अंत नाही. हे जग कोणी निर्माण केले, जर हे ईश्वराचे अधिष्ठान असेल आणि ईश्वर हा कर्ता असेल तर त्याचा निर्माता कोण हा प्रश्न निर्माण होतो. या विचारात बुद्धी नष्ट होऊ शकते.
अर्वाचीन काळात अनंत किंवा इन्फिनिटी या वर संशोधन करणारे शास्त्रज्ञ वेडे झाल्याची गोष्ट ऐकली असशीलच.
या श्लोकाचा अतिरेक टाळण्याचे लक्षात ठेवायला पूर्वीच्या अध्यायात कृष्णाने सांगितले आहे. मला शरण ये याचा अर्थ कुठेतरी अधिष्ठान, कर्ता कोण याचा विचार थांबवून हे सर्व माझेच म्हणजे कृष्णाचे इच्छेने होत आहे , या विचाराशी थांबून; स्व:चे म्हणजे अर्जुना तुझे अधिष्ठान काय आणि तू स्वत: कर्ता आहोत हे लक्षात घेउन काम कर.
मी: आजी, हे फार भारी आहे.
गीता आजी: आणखीन एक लक्षात ठेव. पाप पुण्य पुनर्जन्म आणि मोक्ष या कल्पना चांगल्या माणसांना चांगले का वागावे याचे कारण मिळवून देतात. तसेच आत्मा, स्थितप्रज्ञ, बुद्धी, ज्ञान या कल्पना सुद्धा चांगले काम करताना जे अपवाद करावे लागतात किंवा या अपवादातून जे शोक, क्रोध इत्यादी भावना निर्माण होतात त्यांच्या त्रासातून सुटण्यासाठी या व अशा अनेक कल्पना आहेत. त्या कल्पनांचा उहापोह करून कृष्ण अर्जुनाला आपला स्वधर्म म्हणजे युद्ध करायला प्रवृत्त करतो.
‘अहिंसा परमों धर्मः धर्म हिंसा तथैव च’
अहिंसा हे सर्वात पवित्र धर्माचरण आहे. तसेच जगात दुष्ट प्रवृत्ती या धर्म नष्ट करायला सदैव तयार असतात हे ही सत्य आहे. त्यांना या कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी जर हिंसेशिवाय दुसरा मार्ग नसेल तर अशी हिंसा ही अहिंसेपेक्षा श्रेष्ठ धर्माचरण आहे हे शेवटी अर्जुनाला पटते.
गीता आजीने हे सर्व सांगून मग दुसऱ्या अध्यायातील गोष्टी सांगायला सुरवात केली.
©नितीन पाटणकर