गीता आजीच्या गोष्टी – ९

गीता आजीने दुसऱ्या अध्यायातील गोष्टी सांगायला सुरवात केली.

तू विचारतोस ना की आजच्या काळात तुझ्या गाष्टींचा रेलेव्हन्स काय म्हणून. एक सिक्रेट सांगते तुला. युद्ध कुणालाच चुकलेले नाही. प्रत्येक काळात युद्धाचे स्वरूप बदलले पण युद्ध कुणालाच चुकलेले नाही. सुष्ट-दुष्ट, नीती-अनीती, धर्म-अधर्म, न्याय-अन्याय अशी विभागणी झाली तेव्हाच युद्ध जन्माला आले. गेल्या वेळेस आपण बघितले की या द्वैताचे अधिष्ठान कुणाचे, याचा कर्ता कोण या वर विचार करीत बसले तर फक्त ‘याचे उत्तर नाही’ एवढेच उत्तर मिळते. तेंव्हा हे द्वैत आहे, युद्ध असणार आहे. त्यात धर्माने म्हणजेच, पुष्कळांचे सुख आणि अनेक पिढ्यांपर्यंत समाज टिकून राहील असे वर्तन काय त्यावर स्वत:चे अधिष्ठान ठरवावे लागते. हे अधिष्ठान ठरविताना जे कन्फयुजन होते ते अर्जुनाच्या प्रश्नांच्या रूपात आहे. युद्धाचे स्वरूप बदलले तरी कन्फयुजनचे स्वरूप कालातीत आहे. त्यावर कृष्णाने उत्तरे दिली आहेत. ती उत्तरे पटावीत म्हणून त्याने उदाहरणे दिली आहेत.

आपले युद्ध कोणते ते ओळख. तुझ्या युद्धात तुलाही अर्जुनासारखेच प्रश्न पडले तर त्याचा तपशील काय असेल ते बघ आणि तसे प्रश्न विचार. हे जमले तर तुला स्पेसिफिक प्रश्नांची उत्तरे आणि सोबत कृष्णाने दिलेले इतर ज्ञान दोन्हीचा अन्वय लागेल.

तेंव्हा सगळ्या अध्यायात ‘अर्जुन उवाच’ असे म्हणून जे श्लोक आहेत ते प्रश्न आहेत. त्याचे थेट उत्तर आणि अनुषंगिक माहिती ही वेगवेगळी समजून घेता येईल. त्यातील अनेक गोष्टींची तुला गरज नसेल, तर त्या गोष्टी बाजूला ठेव.

हे वर सांगितलेले लक्षात ठेऊन मग मी सांगत्ये त्या गोष्टी ऐक.
दुसऱ्या अध्यायात अर्जुनाचे प्रश्न चवथ्या श्लोकापासून चालू होतात.

कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ।
इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन || ४ ||

गुरूनहत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्ष्मपीह लोके ।
हत्वार्थकमान्स्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥५॥

याचा अर्थ असा की भीष्म द्रोण यासम पूजनीय गुरूंना मारून त्यांच्या रक्ताने माखलेले सुखभोग मला भोगायला मिळतील. ही कल्पनाच मला सहन होत नाही.
शेवटी आठव्या श्लोकात त्याचा प्रश्न आहे

न हि प्रपश्यामि ममापनुद्याद् यच्छोक मुच्छोषणमिंन्द्रियाणाम l
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥८ ॥

‘जो इंद्रियांची पूर्ण ताकद शोषून घेणारा’ असा शोक होत आहे त्यावर मला काही उपाय दिसत नाही. त्या शोकमग्न अवस्थतेवून बाहेर आल्याशिवाय मला युद्ध करता येणार नाही.
पहिल्या अध्यायात अँक्सायटी, पॅनिक अटॅक चे वर्णन आहे. ‘सीदन्ति मम गात्राणि …’.

अर्जुनाला त्यातून बाहेर काढण्यासाठी त्याला कृष्णाने पहिल्यांदा बोलते केले. जरा खोलात शिरून बोलायला लागल्यावर अर्जुनाने ‘शोक’ ही भावना व्यक्त केली. शोक टाळण्यासाठी त्या काळी जे दोन मार्ग होते त्याची कृष्णाने उदाहरणे दिली आहेत. पहिला मार्ग म्हणजे सांख्य किंवा सन्यास आणि दुसरा म्हणजे कर्मयोग. कर्मयोग म्हणजे कर्मफलसंन्यास. या दोन मार्गांची चर्चा दुसऱ्या अध्यायात आहे. या दोन्ही मार्गांचे विवेचन करण्यापूर्वी तू लक्षात घे काही गोष्टी.

गीता आजी सांगते, युद्ध हे अटळ आहे. तुझे युद्ध ओळख. हे युद्ध शरीराची गरज आणि मनाची गरज यामधील असेल, तुझी गरज आणि साभोवताल यांच्यातील असेल, तुझ्या कामना आणि इतरांच्या कामना यातील असेल, तुझा समाज आणि त्यापेक्षा वेगळी धारणा असणारा समाज यातील असेल, तुझे राष्ट्र आणि इतर राष्ट्र यातील असेल. या सर्व युद्धात योग्य निर्णय म्हणजे नीती आणि धर्म याना सुसंगत वर्तन काय म्हणजे ‘पुष्कळांचे पुष्कळ सुख आणि अनेक पिढ्यांपर्यंत समाजाला धरून ठेवण्यासाठी योग्य वर्तन काय’ हे तुला ठरवावे लागेल. ते ठरवताना तुझ्या वर्तनाचे आणि निर्णयाचे भविष्यातील परिणाम हे नीती आणि धर्माला पुष्टी देणारे असावेत असे वाटणे हे चांगल्या माणसाचे लक्षण असते. तसे घडविण्याचा प्रयत्न करताना ‘सर्वांचे सर्व सुख’ साधता येत नाही हे ही लक्षात ठेव. वागताना अँक्सायटी, पॅनिक अटॅक, शोक, क्रोध, मोह, अशा अनेक भावनांच्या आवर्तात सापडून नक्की काय करावे ते ठरवता येत नाही. मग गुणांचा अतिरेक केला जाण्याची शक्यता असते.

गीता आजी सांगते, ज्ञानेश्वरांनी जी कल्पना केली

जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रति वाढो ।भूतां परस्परे जडो ।मैत्र जीवांचे
किंवा

दुरिताचें तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्यें पाहो || जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात
किंवा शांतीपाठात म्हटल्या प्रमाणे

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःख भाग्भवेत् ||
गीता आजी सांगते हे अंतिम ध्येय म्हणून ठीक आहे पण ते व्यवहार्य नाही. तेंव्हा प्रत्यक्ष कृष्णालाही ‘खळांची व्यंकटी’ सांडता आली नाही, जो जे वांच्छिल ते ते देता आले नाही कारण धर्मासोबत अधर्म आणि सुष्टांसोबत दुष्ट असतातच. तेंव्हा युद्ध कुणाला चुकलेले नाही. तुझे युद्ध ओळख. गुणांचा अतिरेक टाळ.

‘अहिंसा परमों धर्मः धर्म हिंसा तथैव च’
हे वचन अहिंसेसारखेच सर्व गुणांना लागू होते. ते डोक्यात ठेव.
उद्या तुला संन्यास या कल्पनेवर आधारलेल्या गोष्टी सांगेन.

©नितीन पाटणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X