रक्तातील साखर मोजणे हे अनेकांसाठी नित्यकर्म असते. कोविडचे संकट जेव्हा घोंगावू लागले, तेव्हा मधुमेह जर नियंत्रणात नसेल तर कोविडचा घाला पडण्याची शक्यता बळावते हे जाणवले होतेच. तेव्हा रक्ताील साखर मोजण्याची जास्त गरज भासू लागली. ( अनेक तज्ञांच्या मते, कोविड होण्याची शक्यता, मधुमेहापेक्षा स्थूल माणसांना जास्त असते. कोविडचा यशस्वी सामना केलेल्यांसाठी एक नवीन समस्या तयार होउ लागली असावी असे मानण्यास वाव आहे. कोविड पूर्वी मधुमेह नसलेल्यांना कोविड मधून बरे झाल्यानंतर मधुमेहाची सुरवात होते आहे. त्या मुळे कोविड होउन गेलेल्यांसाठी रक्तातील साखर वरचेवर मोजण्याची गरज सगळ्यात जास्त आहे. रक्तातील साखर किती असावी हे घरच्याघरी, हव्या त्या वेळी मोजता यावी ही गरज भागवण्यासाठी ग्लूकोमीटर हे अत्यंत उपयुक्त साधन आहे. ते प्रत्येक घरी असावे. पल्स ॲाक्सिमीटर, ग्लूकोमीटर, बीपी मॅानिटर, वेईंग स्केल आणि होम स्पायरोमीटर यांना मी नवपंचायतन म्हणतो.
या ग्लूकोमीटरचा अचूकपणा राखण्यासाठी काय करायला हवे?
१) सर्व इलेक्ट्रॅानिक उपकरणे ही ठराविक कालावधीत प्रमाणित करून घ्यायला हवी. दर सहा महिन्यानी लॅबमधे ब्लडटेस्ट करून घेताना, ग्लूकोमीटर सोबत घ्यावा. रक्त काढल्यानंतर लगेच ग्लूकोमीटर वापरून रक्तातील साखर मोजावी. लॅब रिपोर्ट आणि ग्लूकोमीटर रिपोर्ट या मधे १० टक्क्यापेक्षा कमी फरक असावा. जर हा फरक जास्त असेल तर ग्लूकोमीटर बनविणाऱ्या कंपनीकडून तो कॅलिबरेट करून घ्यावा.
२) बऱ्याच ग्लूकोमीटरमघे एक न्यून असते. रक्तातील साखर खूप जास्त किंवा खूप कमी असेल तर तर ग्लूकोमीटरची अचूकता कमी असते. तेव्हा या मर्यादा काय आहेत, हे मीटर सोबत जे माहितीपत्र असते त्यात दिलेले असते, ते लक्षात ठेवायला हवे.
३) ग्लूकोमीटर वापरताना बोटातून रक्ताचा थेंब मिळविण्यासाठी एक लॅन्सेट किंवा टोचणी असते. ती वापरणे हे सुरवातीस जमत नाही. त्याचे ॲापरेशन समजून घेणे ही पहिली गरज असते. घरातील सगळ्यांना ही कला अवगत असायला हवी. ज्याला नेहमी मीटर लागतो, जर इतर कुणावर त्याची साखर मोजायची वेळ आली आणि जर मीटर वापरता येत नसेल; तर ‘पुस्कस्था विद्या’, असा प्रकार होतो.
४) या टोचण्या प्रत्येकासाठी वेगळ्या हव्यात. अगदी एकाच माणसासाठी वापरल्या जात असतील तरी त्या बदलायला हव्यात वरचेवर. त्या टोचण्या वापरून बोथट झाल्या, त्या वापरताना ‘रक्त कमी आणि वेदना जास्त’ बाहेर पडायला लागली की मगच या बदलल्या जातात. हात स्वच्छ धुतलेले हवेत. बोटांवर राहिलेले साबण, पाणी किंवा बोट निर्जंतुक करण्यासाठी वापरलेले स्पिरीट यांमुळे रीडिंग चुकू शकते. त्या मुळे हात स्वच्छ आणि कोरडे हवेत. हात थंड पडले असतील तरी रक्त मिळविण्यास त्रास होतो. हात वार्म असावेत.
५) बोटांतून रक्ताचा थेंब मिळविताना अगदी नखासोबतचा भाग टाळावा. तो भाग जास्त वेदना देतो. बोटाच्या टोकाचा कडेचा भाग वापरावा. तिथे वेदना कमी होते.
६) लॅन्सेट किती खोलवर जावी बोटात, या साठी लॅन्सेट प्लंजरवर, लेव्हल्स दिलेल्या असतात. जर त्वचा पातळ असेल तर पहिली लेव्हल पुरते. जर त्वचा जाड असेल तर दोन, किंवा तीन लेव्हल पुरतात. क्वचित चार लेव्हल लागते.
७) लॅन्सेट टोचल्या नंतर रक्ताचा एक छोटासा थेंब यावा अशी अपेक्षा असते. रक्ताचा मोठा थेंब बाहेर पडून तो वाहू लागला तर आपण प्लंजरवर जास्त लेव्हल वापरली. जर नुसतीच टोचणी जाणवली पण रक्ताचा थेंब मिळविण्यासाठी बोट स्क्वीझ करावे लागले तर प्लंजरची लेव्हल वाढवायला हवी, किंवा लॅन्सेट बदलायला हवी.
८) ग्लूकोमीटर साठी प्रत्यक्ष साखर मोजण्यासाठी लागतात त्या मेजरिंग स्ट्रिप्स. यावर रक्त धारण करण्याची जागा असते. हल्ली सर्व स्ट्रिप्सवर एक छोटीशी खाच असते. त्या खाचेचे टोक बोटावरील रक्ताच्या थेबाला टेकवले की कॅपिलरी ॲक्शन होउन रक्त त्या खाचेत शिरते. तिथे ग्लूकोज मोजण्याची रासायनिक प्रक्रिया चालू होते. स्ट्रिपच्या दुसऱ्या टोकाला एक चिप असते. या चिपवर अनेक गोष्टी कोड केलेल्या असतात. ही स्ट्रिप मीटरमधे सरकवली की मीटर ॲान होतो. काही क्षणात तो रिडींग घेण्यासाठी तयार होतो. बहुतेक वेळा मीटरच्या डिस्प्लेवर आता रक्ताशी संपर्क येउ दे हे दर्शविणारे चित्र किंवा शब्द येतात. असा ‘गो अहेड’ मिळाला की मगच रक्त स्ट्रिपवर घ्यायचे असते. प्रत्येक मशीनच्या कुवती प्रमाणे पाच ते २० सेकंदात मीटर रीडिंग घेउन आपल्याला दाखवतो.
९) मोजण्याच्या या पायरीवर ‘टाइम मॅनेजमेंट’ करता यायला हवी. जर स्ट्रिपवर रक्त येउ द्या असा संदेश आला आणि त्या नंतर आपण लॅन्सेट वापरून रक्ताचा थेंब काढायला वेळ लावला तर मीटर बंद होतो. स्ट्रिप बाहेर काढून पुन्हा इन्सर्ट करून मीटर तयार होईपर्यंत, रक्ताचा थेंब फुकट जातो. ही सर्व लय यायला मीटर वापरायच्या सुरवातीच्या दिवसात रक्त आंणि स्ट्रिप्स काही वेळा फुकट जातात.
१०) या स्ट्रिपवर जी रासायने वापरलेली असतात, त्याला एक्सपायरी डेट असते. स्टिरपवरील मॅग्नेटिक कोडवर ती डेट वाचण्याची सोय असते. मीटरमधे स्ट्रिप घातली, आणि जर एक्सपायरी डेट उलटून गेली असेल तर मीटर रिडिंग घ्यायला नकार देतो.
११) बरेचदा स्ट्रिप विकत घेतल्यानंतर त्या एक्सपायरी डेट च्या आत संपवल्या नाहीत, तर त्या फुकट जातात.
१२) ग्लूकोमीटर वापरण्याची सवय लागण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विकत घेतलेल्या स्ट्रिप्स फुकट जात नाहीत. वरचेवर ग्लूकोमीटर वापरून, साखरेचे प्रमाण नोंदवून ठेवले, तर उपचारांसाठी फायदा होतो, स्वत:च्या खाण्याच्या, व्यायामाच्या सवयींवर देखरेख राहून लॅांगटर्म हेल्थ बेनेफिट्स मिळतात हा बोनस फायदा.
तर हे होते नवपंचायतनातील दुसरे यंत्र, ग्लूकोमीटर.
पुढील भागात बीपी मॅानिटर बद्दल माहिती घेउ.
Dr Nitin Patankar
Consultant – Diabetes, Obesity and Lifestyle Disorders
Wisdom Clinic – Mulund
Jupiter Hospital Thane
Contact : 9223145555
1 Comment