डाएट – आवड आणि निवड

मिश्टी मुखर्जी या अभिनेत्रीचा अकाली मृत्यू झाला. बातम्यांमधून असं समोर येत आहे की, तिने किटोजेनिक डाएट केल्यामुळे तिच्या किडणीवर परिणाम झाला. किडणी फेल होउन त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. काही महिन्यांपूर्वी वजन कमी करण्याचे औषध घेत असताना, जास्त व्यायाम केल्यामुळे एका फिजिकल ट्रेनर मुलीचा हार्टवर ताण पडून मृत्यू झाला. अशी अनेक उदाहरणे आठवतील.
अशा बातम्या आल्या की तान्हं बाळ झोपेतून चाळवाव तसा समाज चाळवतो. बाळाला थोडं थोपटलं की बाळ पुन्हा गुडुप झोपी जातं. तसच आपल्या सगळ्यांच होतं. थोडे दिवस चर्चा होते. बातम्या, चर्चा, फेसबुक, वर्तमान पत्र सगळीकडे थोडी चुळबुळ होते आणि मग पुन्हा शांत होतं सगंळ. दुर्घटनाग्रस्त व्यक्ती जितकी प्रसिद्ध त्या प्रमाणात ही चुळबूळ किती दिवस चालेल हे ठरते. मिश्टी मुखर्जीच्या दुर्दैवी निधनानंतर कीटो डाएट करणे बंद झाले, कीटो पदार्थ मिळणे बंद झाले असे होणार आहे का ? अजिबात नाही.
तसे होऊही नये.
जेव्हा मोटरकार बाजारात आल्या असतील तेव्हाही सुरवातीस अपघात झाले असतील. तेव्हाही अशाच बातम्या आल्या असतील. कुठे चर्चाही झडल्या असतील. “नेहमीची घोडागाडी वापरायची सोडून असली थेर करायला गेलं की हे असं व्हायचच” असं ही कुणी बोललं असेल. विमान प्रवासाचे उदाहरण घ्या. एवढं वजन हवेत वर जातं, आणि पुन्हा सुरक्षित खाली जमिनीवर येतं, यात किती प्रचंड धोका आहे. किंचित चूक आणि खेळ खलास. विमानांचे अपघात होत नाहीत का ? होतात. तरीही विमान प्रवास हा प्रवासाच्या प्रकारातील सर्वात सुरक्षित प्रकार आहे. कारण काय ?
अतीकडक देखभाल करण्याची तयार केलेली पद्धत. तसेच घालून दिलेली मार्गदर्शक तत्व पाळण्यासाठी तावून सुलाखून तयार झालेले तंत्रज्ञ. विमान प्रवासात घडणाऱ्या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्याची यंत्रणा आणि महत्वाचे म्हणजे प्रत्येक गोष्टीची जबाबदारी निश्चित केलेली.
आरोग्य आणि विमान प्रवास यांची तुलना करून बघा.
मिष्टीच्या किटो डाएटचं उदाहरण घेउया. तिचा दुर्दैवी मृत्यू म्हणजे विमान अपघात समजूया.
काही जण म्हणतील, “मी या पुढे कधीही विमान प्रवास करणार नाही”. कुणी म्हणेल, “ यापुढे विमान सोडाच, मी ज्यात उडावे लागते असा प्रवास वर्ज्य.” अशीच अजून काही वाक्य
कुणी फक्त जमीनीवर प्रवास करीन, पाणी किंवा हवा, यातून प्रवास करणार नाही; असे ठरवेल
किंवा जमीन, पाणी किंवा हवा; कुठेही वेगवान प्रवास करणार नाही असेही ठरवू शकेल.
नवीन शोध, नवीन सोय किंवा प्रत्येक नवीन डाएट प्लॅन हा नव्या माहितीवर, नव्या गृहितकांवर आधारित असतो. तो रिझल्ट जास्त चांगले, जास्त लवकर देतो. (चिरकाल टिकणारे रिझल्ट कुठच्याही डाएटमधून मिळत नाहीत). जेव्हा डाएट हा लोकप्रिय होतो, अनेक जण सरसकटपणे फॅालो करतात, नुसत यूट्यूब पाहून, वॅाट्स ॲप वर वाचून, जबाबदारी न घेणाऱ्या माणसांच्या सल्ल्याने, ‘करून बघा नुकसान नाही झाला तर फायदा’ या वेडगळ समजुतीमुळे कसलेही प्रयोग करून पाहतात; तेव्हा समस्या निर्माण होतात.
डाएट कुठच्या प्रकृतीसाठी उपयोगी पडेल ? किती इंटेन्सिटी असावी ? कधी थांबावे ? आणि यात डाएट चालू असताना वरचेवर दोन गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते. एक तर इप्सित साध्याच्या दिशेने ठरविलेल्या गतीने वाटचाल होत आहे ना? (तसे नसेल तर डाएटच्या तीव्रतेत बदल करावे लागतात). त्या हून ही महत्वाची गोष्ट म्हणजे इप्सित साध्याकडे वाटचाल चालू असताना, मानवी शरीर आणि मन यात भविष्यात त्रासदायक वा धोकादायक बदल घडण्याची सुरवात रोखणे. हे सर्वात कठीण काम असते.
त्या साठी डाएट बद्दल मार्गदर्शन करणाऱ्याला आणि डाएट करणाऱ्याला, प्रत्येक टप्प्यावर चेकलिस्ट तयार ठेवावी लागते. डाएटची चेकलिस्ट ही हवाईप्रवासासाठी वापरतात तशी कडक हवी.
असेही म्हणता येईल की डाएटची पूर्ण प्रोसेस ही प्रेग्नन्सी ते सेफ डिलिव्हरी अशी असते. निबिड जंगलातील भिल्लीण झाडाखाली प्रसूत होउन बाळ पाठीस मारून कामाला लागते. गावात सुईणींच्या हातून जितक्या सेफ डिलिव्हरीज होतात तितक्या शहरात गायनॅकॅालॅाजिस्टकडे होत नसतील. तरीही प्रसूतीसाठी उत्तम गायनॅकॅालॅाजिस्टकडे गर्भधारणेपूर्वी नाव नोंदविले जाते. सगळ्या टेस्ट केल्या जातात. ‘गायनॅकॅालॅाजिस्ट गरज नसताना सीजर करतात” असं म्हणत गायनॅकॅालॅाजिस्टच्या देखरेखीखाली डिलिवरी होऊ देतात. का करतात हे सर्व ?
त्यांना बाळाची सेफ डिलिवरी हवी असते. त्यांना आई सुरक्षित हवी असते. डिलिवरीच्या वेळेस काही इजा होउ शकतात ज्या पुढील आयुष्यात बाळाला त्रासदायक ठरू शकतात. अशा इजांची शक्यता त्यांना टाळायची असते.
डाएट करताना हीच भुमीका सूज्ञ माणसे घेतात.
डाएट बद्दल मार्गदर्शन घेताना ते कुणाकडून घेतो आहोत त्याची योग्यता तपासतात.
डाएट चालू असताना सेफ्टी चेकलिस्ट तपासत राहतात.
डाएट बद्दल सल्ला देणाऱ्यांमधे विविध प्रकार असतात

१) स्वानुभवी
काही जणी स्वत:ची सेफ डिलिवरी झाली या निकषावर इतर बायकांना डिलिवरीतील तज्ञ म्हणून सल्ला देतात. स्वत: यशस्वी डाएट केला म्हणून लोक यांच्याकडून सल्ला घेऊ लागतात.

२) अनुभवी
सुइणी. ‘कंपाउंडरला डॅाक्टरांपेक्षा जास्ती कळते’ या पंथाचे लोक ‘सुईणीला गायनॅकॅालॅाजिस्टपेक्षा जास्ती कळते’ असे मानतात आणि डाएटसाठी त्यांचा सल्ला घेतात

३) ज्ञानानुभवी
हे लोक अन्नशात्र किंवा वैद्यक शास्त्र शिकून इतरांना सल्ला देतात. काही लोक यांच्याकडूनही डाएटचा सल्ला घेतात.
तर मिश्टी मुखर्जीच्या दुर्दैवी मृत्यूच्या मागे, ‘कीटो डाएट केल्यामुळे किडणी फेल होउन मृत्यू’ हे तात्कालिक कारण असले तरी त्या वरून कीटो डाएट मुळे किडणी निकामी होतात असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.
कीटो डाएटची ती एक रिस्क आहे हे ध्यानात ठेवून काळजी घ्यायला हवी. ‘रस्ता ओलांडताना गाडीची धडक लागून मृत्यू’ ही बातमी वाचून कुणी गाडी वापरण्यावर किंवा रस्ते बांधण्यावर बंदी घालावी अशी मागणी करीत नाही.
तेव्हा डाएट मधे आवडी पेक्षा निवड महत्वाची असते. डाएट आवडता असून भागत नाही, तुमची गरज आणि सुरक्षा लक्षात घेउन निवडावा लागतो. तसेच डाएटचा सल्ला कुणाकडून घ्यायचा हे, डाएट देणारा माणूस मला किती आवडतो या पेक्षा त्याची योग्यता पाहून निवडावा लागतो.
Fb live वर भेटूया येत्या रविवारी 18 ऑक्टोबर,सकाळी 9 वाजता
विषय : Sunshine Hormone
अर्थात व्हिटॅमिन डी

डॅा. नितीन पाटणकर एम्.डी.
Consultant : Diabetes, Obesity and Sound-Yog
Director – Wisdom Clinic
FB – Health and Wisdom
YouTube : In Search of Wisdom
Contact : 9223145555

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X