डायरीतील पाने 2

२ जानेवारी २०२२

१० ए एम्
काल रात्री झोपताना उद्या सकाळी लवकर उठून चालायला जायचे हा निश्चय करून झोपलो होतो. बायॅालॅाजिकल क्लॅाक एकदा सेट केले की बाहेरील गजर न लावताही उठता येते असे वाचले होते. रात्री मनामधे सकाळी सहाचा गजर लावला. आता उठून पहातो तो सकाळचे दहा वाजले आहेत.
नेहमीचा घड्याळाचा गजरही झाला नाही. ते का झाले त्या मागे काय गूढ असावे?
आज रविवार. त्या मुळे घड्याळ्याचा गजर बंद ठेवलेला असतो. रविवारी मनाच्या घड्याळाचाही गजर बंद होतो का ?
कुणातरी तज्ञ माणसाला विचारायला हवे.

काल शनिवार होता आणि १ जानेवारी.
शनिवार हा ‘न कर्त्याचा’ वार म्हणतात. बुधवार आणि शनिवारी केसही कापू नयेत असे म्हणतात.
मी काय जो कृतनिश्चय करायचा तो शनिवारपासून नको असे बायको म्हणाली होती.
तिचे ऐकायला हवे होते असे एक मन सांगते आहे तर या सर्व अंधश्रद्धा आहेत असे दुसरे मन सांगते आहे.

२ पी एम्
बायकोचे ऐकायचे की अंधश्रद्धाना थारा द्यायचा नाही
माणसाला दोन मने का असतात. अशा चिंतनात वेळ कधी आणि कसा गेला ते कळले नाही. यालाच ‘सविकल्प समाधी’ म्हणत असावेत.
स्वयंपाक घरातून काही आवाज येत आहेत.

“असेच लोळत पडलात तर नाश्ता चुकण्याइतपत तरी डाएटिंग होईल. आता जेवायला या. आयुष्यात केव्हातरी एकदा ठरवली की ती गोष्ट नक्की करा. नाही जमत एखाद्यास तर निदान आपण ठरवू त्याला कृतनिश्चय वगैरे तरी म्हणू नये”

माणसाने सुरवातीस अपयश आले तरी टीकेमुळे निरुत्साहित न होता पुढे जात राहिले पाहिजे हे वाक्य सुचले.
आज नेमकी बायकोने बटाट्याची भाजी, पुरी, वरण भात आणि कांदाभजी केलेली. डाएटिंगमधे घरच्यांची साथ किती महत्वाची असते ते इथे कळते.
इतके जेवून शतपावली करायला सुरवात केली. चालताना जांभया येउ लागल्या. पाय जड होउ लागले.
मग लक्षात आले की जेवल्यानंतर अन्नपचनासाठी रक्तप्रवाह जठराकडे वळतो. पचनासाठी जेवल्यावर चालणे म्हणजे वासराचा पान्हा माणसाने चोरण्यासारखे आहे.
मग या गोष्टीवर विचार करण्यासाठी आरामखुर्चित टेकलो.

८ पी एम्
माझी बहुतेक शुद्ध हरपली असावी. आता बाहेर अंधार पडला आहे. माझी शुद्ध हरपली होती बहुतेक असे बायकोस सांगितले. ती म्हणाली, “शुद्ध हरपली होती नक्की. सोबत जिवाला घोरही लागला होता. एखादा ट्रक चढणीवर चढताना आवाज करेल तसे आवाज घशातून निघत होते. त्याची पण तुम्हाला जाणीव झाली नाही म्हणजे शुद्ध हरपली होती. माझ्या माहेरी याला ‘घोरत पडणे’ म्हणतात.

१० पी एम्
आजचा एकूण दिवस भाकड गेला.
आजची सर्वात महत्वाची उपलब्धी म्हणजे नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या मधे जर लक्ष खाण्याकडे नसेल तर न खाता राहता येते हे कळले.
रात्री हलका आहार घेणार आहे. फक्त ताक. रात्रीत साखर कमी होउ नये म्हणून चार बटरटोस्ट आणि त्यावर थोडा मध इतके घेउन मगच झोपी जाइन.
वजन कमी करण्याच्या सुरवातीच्या काळात सेटबॅक येत असणारच.

उद्या सकाळसाठी ६.३०, ६.४५, ७, ७.२० असे गजर लावून ठेवले आहेच. बायॅालॅाजिकल क्लॅाकही ६.३० ला सेट केले आहे.
एक बांग देण्याचं ट्रेनिंग दिलेला कोंबडा गजर करण्यासाठी ठेवावा का ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X