३ जानेवारी २०२०
सोमवार
६.५३ ए एम्
सकाळी लवकर जाग आली. आज चालायला जायचेच. एवढीच नोंद करायला वेळ आहे.
९ पी एम्
केल्याने डायरी लेखन
होते जंत्री, जगात संचार
या सर्वांने मनुजा अंगी
चातुर्य येतसे फार
डायरी लिहायला लागल्यापासून सुभाषित भासणारी वाक्य सुचू लागली आहेत. जर कधी प्रसिद्ध व्यक्ती झालो तर हीच वाक्य ‘quotes’ म्हणून प्रसिद्ध होतील. लिहून ठेवण्याचा हा ही फायदा आहेच.
आज सकाळी चक्क चालायला बाहेर पडलो.
चालण्यासाठी योग्य बूट हवेत. ते विकत घेण्याचा विचार करणार इतक्यात तीन वर्षांपूर्वी योग्य बूट घेतले आहेत याची हिने आठवण करून दिली. तेच बूट घालून चालायला आलो. तीन वर्षांनी तेच बूट पायाला व्यवस्थित बसत आहेत. तीन वर्षांपूर्वी वजन ९३.७ किलो होते. आज १०० आहे. या वाढलेल्या ६.३ किलोतील वजन निदान पायावर वाढलेले नाही हा केवढा मोठा दिलासा आहे.
हिंदीत ‘पॅांव भारी होना’ असे काहीसे म्हणतात तसे तरी झाले नाही.
सकाळी सात वाजता बाहेर पडले तर तेव्हा दिवसभरांपेक्षा थोडी जास्त थंडी असते किंवा हवा किंचित थंड असते हे कळून येते. इतक्या सकाळी रस्त्यात इतकी माणसे चालत होती बघून विश्वास बसेना. यातील बरीचशी माणसे चालायला निर्ढावलेली असावित असे त्यांच्या चालीवरून वाटत होते.
पहिल्याच दिवशी खूप चालून उद्या पायात गोळे आले म्हणून चालणेच नाही असे आरंभ शूर ठरायला नको म्हणून फक्त नाक्यापर्यंत जाउन परत आलो.
दहाच मिनिटे झाली असतील पण सकाळी चहा न घेता बाहेर पडलो आहोत याची जाणीव होत राहिली. चहा मुळे तरतरी येते असे म्हणतात ते खरे असावे. उद्या पासून चहा घेउन बाहेर पडायला हवे
बाकी दिवसभर काम होते. सकाळच्या चालण्यामुळे असेल संध्याकाळी ॲाफिसमधे भूक जास्त लागली. नेहमी सिंगल वडापाव खातो त्या ऐवजी आज दोन वडे आणि सिंगल पाव खाल्ला.
त्यातल्यात्यात कार्ब्ज कमी ठेवण्याचा प्रयत्न केला.
माझा मेटॅबॅालिझम इनसेन्सिटिव झाला असावा. संध्याकाळी दोन वडे खाउन रात्री भूक कमी व्हायला हवी होती. पण तसे काहीच झाले नाही.
आता झोप मात्र येत आहे. व्यायामामुळे झोप सुधारते असे म्हणतात. ते खरे असावे. रात्री वजन केले. १०० किलोच होते. तीन दिवस वजन कमी करण्याचा विचार सतत मनात आहे. mind over matter म्हणतात ते व्हायला वेळ लागत असावा.
मेटॅबॅालिजम या विषयावर गुगल करायला हवे.
झोपेत जर कानावर काही पडंत राहिले तर ते लक्षात राहते असे म्हणतात. स्लीप लर्निंग असे म्हणतात याला. रशियामधे या वर संशोधन झाले आहे.
तसेच झोपेत म्हणजे स्वप्नात चालले तर कॅलरी जळत असतील का? जागेपणी चालल्याने जळतील इतक्या नसतील पण काही टक्के तरी जळत असतील.
मनी वसे ते स्वप्नी दिसे असे म्हणतात. सतत मनात चालण्याचा विचार ठेवला तर हे शक्य व्हायला हवे. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ म्हणतात तसेच रोज झोपेत थोड्या कॅलरीज जाळल्या तर वर्षभरात कितीतरी किलो वजन कमी होईल.
या वर संशोधन व्हायला हवे.
बघूया.
पूर्वी जेव्हा केव्हा वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा नेहमी चालण्या ऐवजी खाण्याची स्वप्न पडायची. आता चालण्याची पडावित असे मनात ठेवायला हवे.
आता लिहिणे थांबवतो नाहीतर झोप उशीरा लागेल. मग पुन्हा उठायला उशीर होईल.