अर्थात माघार मधुमेहाची – २
गेल्या लेखात आपण मधुमेहाचे निदान कसे केले जाते ते पाहिले. त्यात अव्यक्त मधुमेह आणि मधुमेह असे दोन भाग असतात हे ही पाहिले. या लेखात मधुमेहाची माघार किंवा Reversal Of Diabetes म्हणजे नक्की काय ते पाहू.
मधुमेहाचे निदान झाले की त्यावर उपाय करायला सुरवात करण्यापूर्वी काही प्रश्न हमखास विचारले जातात. त्यांची झलक पाहू.
१) जिथून रिपोर्ट केला ती लॅब किती रिलाएबल आहे? दुसऱ्या लॅब मधून करून घेऊ का रिपोर्ट ?
(जर रिपोर्ट नॉर्मल असतील तर मात्र हा प्रश्न डोक्यातही येत नाही)
२) असा अचानक कसा होऊ शकतो डायबेटीस? मला काही त्रास नाही, लघवीला जास्त होत नाही, लागले कुठे तर लगेच बरे होते. घरात कोणालाच डायबेटीस नाही (किंवा आई वडील कोणाला तरी असेल तरी तो खूप लेट चालू झालेला असतो)
३) मी चालायला चालू केलाय, साखर पूर्ण बंद, डाएट मध्ये मारी बिस्किटे चालू केली आहेत. (मारी बिस्किटे हा प्रकार डायबेटीस, ओबेसिटी यावर रामबाण उपाय आहे अशी अनेकांची श्रद्धा असते)
४) हा स्ट्रेस डायबेटीस असणार. मी करतो उपाय. तुम्ही तात्पुरती घरगुती औषधे द्याल का?
मधुमेहावर त्याच्या तीव्रतेप्रमाणे उपचार चालू केले जातात. बहुतेक वेळा सुरवात आहार आणि व्यायाम यांनी केली जाते. कधी मेटफोर्मीन नावाचे औषध वापरले जाते. क्वचित इतर औषधे वापरली जातात.
जे काही उपाय केले आणि त्याला यश मिळाले की साखरेचे रिडींग नॉर्मल येते. त्या बरोबर पुढचा प्रश्न येतो
५) रिडींग नॉर्मल आले म्हणजे माझा डायबेटीस बरा झाला, रिव्हर्स झाला की चांगला कंट्रोल आलाय फक्त; हे कसे ओळखायचे ?
यातील बरा झाला का ? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. कारण कसलेही पथ्य न पाळता, खास व्यायाम वगैरे न करताही पुढील आयुष्यभर साखर नॉर्मल रहात असेल तर ‘डायबेटीस’ बरा झाला असे म्हणता येईल. एकदा का बरा झाला असे म्हटले की तो पुन्हा होईल का हा प्रश्न उरतोच. त्याचे उत्तरही, एकदा झाला तर पुन्हा होऊ शकतो असे देता येईल. असे अनेक फाटे या प्रश्नाला पडतात. त्यामुळे सध्यातरी ‘डायबेटीस बरा होत नाही’ असे उत्तर योग्य आहे.
आटा डायबेटीस कंट्रोल म्हणजे काय ते पाहू. आहार नियंत्रण आणि व्यायाम या दोनच गोष्टींवर विसंबून राहून साखर उत्तम नियंत्रणात राहू शकते. कदाचित आहार नियंत्रण, व्यायाम आणि औषधयोजना (ज्यात इन्सुलिन चा वापरही असू शकतो) अशा उपायांमुळे साखर नियंत्रणात राहू शकते. या सर्वाना ‘उत्तम नियंत्रणात असलेला डायबेटीस’ असे म्हणता येईल. याचा संबंध
HbA1c, Fasting, Post Lunch या तिन्ही व्हॅल्यूज नॉर्मल राहण्याशी आहे. या सर्व व्हॅल्यूज नॉर्मल असूनही जर का जी.टी.टी. म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट केली तर मात्र ती ऍबनॉर्मल येते. आता डायबेटीस रेव्हर्सल म्हणजे मधुमेहाची माघार म्हणजे काय ते बघू. काही उपाय करून जर HbA1c, Fasting, Post Lunch नियंत्रणात राहिले, ते नियंत्रणात राहताना समजा इन्सुलिन आणि औषधे कमी प्रमाणात घ्यावी लागली किंवा पूर्ण बंद झाली आणि जी.टी.टी. म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नॉर्मल झाली तर डायबेटीस रिव्हर्सल शक्य झाले किंवा मधुमेहाने माघार घेतली असे म्हणता येईल.
पुढील लेखात डायबेटीस का होतो ते बघण्यापासून सुरवात करू म्हणजे रिव्हर्सल करताना काय गोष्टी करायला लागतात आणि का करायला लागतात ते समजायला मदत होईल
© नितीन पाटणकर एम.डी.