रिव्हर्सल ऑफ डायबेटीस – ३

आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी (cell) ही एखाद्या कारखान्यासारखी असते. अहोरात्र चालू असलेला कारखाना. शरीरातील अवयव हे इंडस्ट्रियल झोन सारखे असतात. जसे इलेक्ट्रॉनिक, आय्.टी., रासायनिक, फार्मा, इंजिनिअरींग कारखान्यांचे झोन असतात तसे झोन्स म्हणजे विविध अवयव. यांना रॅा मटेरियल सप्लाय करण्यासाठी, वीज, पाणी, पुरविण्यासाठी रक्तवाहिन्या असतात. या सर्व क्रिया कंट्रोल करण्यासाठी आणि सिंक्रोनाईज करण्यासाठी कमांड सेंट्रल असते. याच कल्पनेचा विस्तार करीत गेल्यास सर्व शरीराची रचना आणि कार्य समजावून घेता येउ शकते. आपल्या मेंदूला शरीरातील कॅांप्यूटर म्हणतात.

याच संदर्भात मला दोन इंजिनिअर्सचा संवाद आठवतो. एक सॅाफ्टवेअर इंजिनिअर तर एक मेकॅनिकल इंजिनिअर. सॅाफ्टवेअर इंजिनिअर सांगत असतो, “डेटा ॲनालेसिस, आणि प्रिसिजन प्रोसेसिंग ही कामे आम्ही करतो म्हणून आज सर्व क्षेत्रात प्रगती होते आहे”, सुबत्ता येते आहे. तर मेकॅनिकल इंजिनिअर त्याला उत्तर देतो, “कितीही डेटा ॲनालिसिस आणि कंट्रोल सिस्टिम लावून तुम्ही ॲाप्टिमायजेशन साध्य केलेत तरी प्रत्यक्ष काम केल्याशिवाय प्रॉडक्शन होत नाही. सॅाफ्टवेअर नाही शेती करू शकत की इमारत उभी करू शकत. तिथे प्रत्यक्ष काम करायला माणसाचा किंवा रोबोचा ‘मसल’ लागतो. ते काम आम्ही मेकॅनिकल इंजिनिअर करतो.

आपल्या शरीरात मेंदू हा सॅाफ्टवेअर इंजिनिअर असेल तर मसल्स हे मेकॅनिकल इंजिनिअर असतात. प्रत्यक्ष काम त्यांच्याकडून होते. हे काम अहोरात्र चालू असते.
डायबेटिस रिव्हर्सल समजण्यासाठी मसल्सचे काम सतत चालू ठेवण्यासाठी उर्जा, इंधन किंवा फ्युएल कसे मॅनेज केले जाते ते आधि समजावून घ्यायला हवे. कारण डायबेटीस या व्याधीचे मूळ स्वरूप हे ‘इंधनाचे चुकीचे व्यवस्थापन’ (Fuel Mismanagement) असे असते. तेव्हा इंधन व्यवस्थापन सुरळीत असताना काय होत असते ते कळले तर ते सुरळीत नसताना काय होते आहे ते कळेल.

शरीराच्या कारखान्यात मसल काम करीत आहेत. त्यांला अन्न किंवा उर्जा मिळत राहण्याचे तीन मुख्य सोर्स आहेत.
१) लंच आणि डिनर – घरून डबा येतो.

२) स्नॅक्स – लंच टाईम सोडून इतर वेळेस भूक लागली तर? कॅंटीन २४ तास चालू असते. कॅंटीनमधला पोऱ्या खाद्यपदार्थांची ट्रॅाली घेउन सतत फिरत असतो. गरज असेल तेव्हा स्नॅक्स ट्रॅालीवरून घ्यायचे.

३) मंचिंग – खिशामधे ड्रायफ्रूट्स किंवा चॅाकलेट ठेवलेली असतात. लंचला जायला जमले नाही, स्नॅक्स कमी पडले किंवा मध्येच चाळा म्हणून हे मंचिंग उपयोगी पडते.
या तीन पद्धतीने मसल्सना सतत फ्युएल मिळत राहील याची काळजी घेतली जाते.

लंच आणि डिनर ला जो डबा येतो त्यात असते शुगर आणि फॅट. तो डबा पोचवायला डबेवाला असतो त्याचे नाव इन्सुलिन.
कॅंटीन मधून २४ तास जी स्नॅक्स सर्व्हिस असते त्यातील स्नॅक्स म्हणजे फॅट सेलमधून आणि लिव्हर मधून बाहेर येणारी फॅट आणि रात्री लिव्हर मधून बाहेर पडणारी शुगर.
मंचिंग साठी जी ड्रायफ्रूट्स किंवा चॅकलेट म्हणजे मसल्स च्या आतमधे साठवून ठेवलेली फॅट.

मसल्सना सतत काम करीत राहण्यासाठी, फ्युएलचा अखंड पुरवठा चालू रहावा म्हणून ही सर्व योजना असते. हा पुरवठा कमी झाला तर काय करायचे यांवर शरीराकडे अनेक उपाय आहेत. हा पुरवठा जास्त झाला तर काय ?

माणूस खर्चापेक्षा खूप जास्त कमाई करू शकतो, माणूस खर्च होणाऱ्या फ्युएलपेक्षा जास्त फ्युएल ॲार्डर करू शकतो किंवा गरजे पेक्षा जास्त खाउ शकतो पण मसल्सकडे आलेले फ्युएल साठविण्याची अगदी तुटपुंजी सोय असते. खिशात ड्रायफ्रूट्स किंवा चॅाकलेट ठेवावी तितपत फॅट मसल्सच्या आत साठवून ठेवतां येते. बाकी आलेले फ्युएल जाळले गेले नाही तर मसल्स ती डिलिव्हरी शक्यतो घेत नाही.

शरीरामधे असे अतिरिक्त फ्युएल साठविण्याचे काम लिव्हर आणि फॅट सेल्स करतात. जर अन्न जास्त शिजवले गेले तर आपण ते फ्रीजमधे ठेवतो ते फ्रीजचे काम शरीरात लिव्हर आणि फॅट करतात. या फ्रीजमधील अन्नाचे काय होते किंवा साठलेल्या फ्युएलचे काय होते हे समजले तर डायबेटीस का होतो आणि तो रिव्हर्स कसा करायचा ते नीट कळेल.

©️ नितीन पाटणकर एम्.डी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X