रिव्हर्सल ऑफ डायबेटीस – ४

लिव्हर आणि फॅट सेल्स मधे अतिरिक्त फ्युएल साठले की त्याचे पुढे काय होते ?

फ्युएलचा जास्त साठा झाला तर मेंदूला संदेश जातो की आता लंघन करायचे आहे. या संदेशाचे पालन झाले तर एक दिवस उपास केला जातो किंवा कमी अन्न सेवन केले जाते. मसल्स (आणि इतर पेशी) काम करीत राहतात. त्यांना लागणारे फ्युएल हे अन्नाऐवजी या साठवलेल्या फ्युएलमधून पुरवले जाते. अतिरिक्त भार हलका होतो आणि पुन्हा सर्व मूळपदावर येते.
‘कमी खा’ असे सांगणारे संदेश हे साधेसुधे, एखादं गाणं गुगुणावं तसे असतात. खाण्याच्या पदार्थांचे रूप, रंग, गंध आणि त्यांच्या आकर्षक कॅांबिनेशन्सच्या खाण्याच्या मेमरिज यांतून मात्र, ‘अजून खा’ हा संदेश मोठ्या ताकदीने दिला जातो. त्या मुळे कमीजास्ती प्रमाणात गरजेशिवाय जास्त अन्न शरीरात जाते.

गरजेपेक्षा जास्त अन्न शरीरात गेले की काय होते? त्या अन्नाची रवानगी लिव्हर आणि फॅट सेल्स कडे केली जाते. या दोन अवयवांमध्ये इमर्जन्सीकरता लागेल इतपत शुगर आणि फॅटचा साठा असतो. लिव्हरमधे शुगर च्या रेणूंची मोठी माळ गुंफून अशा माळा साठवल्या जातात. त्यांना ‘ग्लायकोजेन’ असे म्हणतात. या शब्दाचा अर्थ ‘ज्या पासून गरज पडल्यास ग्लुकोज बनवतां येते’ असा आहे. लिव्हरमधे फॅट साठविण्याची माफक सोय असते. लिव्हरचे महत्त्वाचे काम म्हणजे सर्व अतिरिक्त अन्नाचे फॅटमधे रूपांतर करून ती फॅट साठवणुकीसाठी फॅटसेल्स कडे पाठवून देणे.

फॅटसेल्समधे मगाशी म्हटल्याप्रमाणे फॅटचा राखीव साठा असतोच. आता जो अतिरिक्त साठा येतो त्याचे काय होते ते बघूया.
१) उत्तम मार्ग – आलेल्या अतिरिक्त फॅटचे ‘कार्बन-डाय-ॲाक्साईड’ आणि पाणी यांत रुपांतर करणे. फॅटच्या एकूण वजनाच्या ८६% वजन हे ‘कार्बन-डाय-ॲाक्साईड’ या स्वरूपात फुफ्फुसातून उत्सर्जित होते. उरलेले १४% वजन हे पाण्याच्या स्वरूपात किडनीमधून बाहेर टाकले जाते. हा मार्ग ज्यांच्या कडे उपलब्ध असतो, त्यांनी कितीही खाल्ले तरी वजन वाढत नाही की त्यांना खाण्यातून मधुमेह होत नाही.

२) मध्यम मार्ग – या मधे उत्तम मार्ग फार कमी प्रमाणात वापरात येतो. अतिरिक्त फॅट येतच राहिली तर प्रथम फॅट च्या पेशी फॅट साठवून घेताना टम्म फुगतात. ती ही मर्यादा ओलांडली गेली तर फॅटच्या नवीन पेशी तयार होत राहतात. या मार्गातील लोकांचे वजन वाढत राहते पण अतिरिक्त चरबी रक्तात पुन्हा उलटी वाहात येत नाही. त्या मुळे त्यांना मधुमेह होत नाही.
३) मधुमेही मार्ग – यांत उत्तम मार्ग अत्यल्प आणि मध्यम मार्ग सुरवातीस ७०-८० वापरला जातो. जसजसे वजन वाढू लागते तसतसे मध्यममार्ग वापरण्याचे प्रमाण कमी होत जाते. म्हणजे सुरवातीस वजन वाढते, पण जसे वजन वाढत जाते तसा वजन वाढण्याची गती कमी होत जाते. जशी फॅट सेल लठ्ठ होते आणि त्याची संख्या वाढते त्या प्रमाणात चरबीच्या पेशींकडून ‘कमी खा’ हा संदेश जास्त ओरडून दिला जातो. त्या मुळे खाणे कमी होते पण ते पुरेसे कमी होत नाही. याच सोबत येणारी अतिरिक्त चरबी फॅटसेल्स मधून बाहेर लीक होत राहते. चरबी लीक होत राहणे किंवा चरबीची गळती ही खूप महत्वाची घटना असते. या मार्गात मध्यम मार्गाप्रमाणे वजन खूप वाढत नाही पण फॅटची गळती होउन अनेक हॅार्मोनल आणि रासायनिक प्रक्रिया ट्रिगर होतात आणि त्यातूनच पुढे मधुमेह होतो.

चरबीची ही गळती होत राहिली तर त्यातील काही चरबी ही लिव्हरमधे सामावून घ्यायचा प्रयत्न केला जातो. लिव्हरच्या पेशी फुगतात. अशा वेळेस सोनोग्राफीमधे, ‘लिव्हरचा साइज वाढला आहे’ (Hepatomegaly) असे निदान होते. कधीकधी चरबी या लिव्हरच्या पेशीमधून बाहेर सटकते. त्या सटकलेल्या चरबीच्या प्रमाणानुसार सोनोग्राफीवर ‘फॅटी लिव्हर’ (Fatty Liver) आणि ग्रेड १,२ किंवा ३ असे लिहून येते.

चरबीच्या पेशींमधून चरबीची गळती होत राहिली तर ती रक्तवाहिन्यांच्या भिंतीला चिकटते आणि त्याला ‘धमनिकाठिण्य’ (Atherosclerosis) म्हणतात. हीच चरबी मसल्सच्या आत सुद्धा शिरते. मसल्सच्या आत जास्तीची चरबी साठून राहिली की डॅामिनो इफेक्ट सारखे पुढचे परिणाम दिसतात. त्यातूनच ‘अव्यक्त मधुमेह’ Pre-diabetes आणि मधुमेह Diabetes ची मुहूर्तमेढ होते.
ते कसे ते पुढच्या लेखात पाहू

©️ नितीन पाटणकर एम्. डी.

लेख आवडले तर नावासकट नक्की शेअर करा. ‘हेल्थ ॲंड विस्डम’ पेज ला लाईक करा. In Search of Wisdom या यू ट्यूब चॅनेल वर या लेखांचे इंग्रजी विडिओ आणि इतर बरेच विडिओ मिळतील. ते चॅनेल लाईक करा, सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X