रिव्हर्सल ऑफ डायबेटीस या विषयावर मराठीतून लेखमाला लिहिण्याचा आग्रह अनेक मित्र मैत्रिणींनी केला. हा विषय तर माझ्या जिव्हाळ्याचा आणि ज्यात सतत काही नवीन शोध लागत आहेत, नवी माहिती समोर येत आहे असा जिवंत विषय. सध्या गीता आजीच्या गोष्टी ही लेखमाला लिहीत आहे. त्यात बराच वेळ जातो. सध्या अनेक ऍप्स आणि प्रोग्रॅम्सच्या माध्यमातून ‘रिव्हर्सल ऑफ डायबेटीस’ हा विषय लावून धरलेला आहे. त्यासाठी ५०० रु. ते अगदी ४०००० रु. अशी फी आकारली जात आहे. काही ठिकाणी १०६००० अशी फी घेतली असेही कुणी सांगितले. गेली दोन वर्षे ‘हेल्थ आणि विस्डम’ च्या फेसबुक लाईव्ह मधून आणि ‘इन सर्च ऑफ विस्डम’ च्या यु ट्यूब चॅनेल वरून मेडिकल संबंधातील माहिती; स्वत: किंवा त्या त्या विषयातील तज्ज्ञांना बोलावून आम्ही लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करीत आहोत.
“बढाई नाही, बनवाबनवी नाही अशी माहिती फार थोडयाठिकाणी मिळते त्यातले एक म्हणजे हेल्थ अँड विस्डम चे पेज आणि चॅनेल” ही दाद अनेकांनी दिली. त्या उपक्रमामुळे मैत्र जुळलेल्या अनेकांनी केलेला आग्रह मोडणे शक्य नाही. त्यामुळे ही लेखमाला देखील सुरु करीत आहोत.
तसेच अनेक जणांनी हे सर्व इंग्रजीमध्ये सुद्धा उपलब्ध करण्याची विनंती केली आहे. सांगायला आनंद वाटतो की विस्डम क्लिनिकच्या सर्व दृक्श्राव्य कार्यक्रमांची निर्माती आणि सूत्रधार वेदश्रीने रिव्हर्सल ऑफ डायबेटीस च्या लेखमालेचे इंग्रजीत व्हिडीओ बनविण्याचे काम स्वीकारले आहे. ते सर्व यु ट्यूब चॅनेल ( In Search of Wisdom ) वर उपलब्ध असतील. तेंव्हा या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे अभिप्राय कळवा.
Reversal of diabetes ला मराठी शब्द काय असावा असा अनेकाना प्रश्न विचारला. Reversal म्हणजे Cure (बरे होणे) नाही.
मधुमेह आहे हे निदान कसे होते? उपाशीपोटी रक्तातील साखर 126 मिलिग्रॅम / डीएल किंवा जास्त असेल किंवा 75 ग्रॅम ग्लुकोज घेऊन दोन तासांनी रक्तातील साखर 200 मिलिग्रॅम / डीएल किंवा जास्त असेल तर मधुमेहाचे निदान होते. कुठच्याही रँडम वेळेस साखर चेक केली आणि ती 200 मिलिग्रॅम / डीएल च्या वर असेल तरी मधुमेह असल्याचे निदान होते. एच. बी. ए. 1 सी. 6.5 पेक्षा जास्त असेल तरी मधुमेह आहे असे निदान करता येते.
मधुमेह नाही हे निदान कसे होते ? मधुमेह आहे हे प्रमाणपत्र मिळवायला वरीलपैकी कोणतीही एक चाचणी उपयोगी पडते. मधुमेह नाही हे प्रमाणपत्र मिळवायला मात्र तीन चाचण्या कराव्या लागतात. उपाशीपोटी रक्तातील साखरेचे प्रमाण 110 मिलिग्रॅम / डीएल पेक्षा कमी, 75 ग्रॅम ग्लुकोज घेऊन दोन तासांनी रक्तातील साखर 140 मिलिग्रॅम / डीएल पेक्षा कमी आणि एच. बी. ए. 1 सी. 5.7 पेक्षा कमी असेल तर मधुमेह नाही हे म्हणता येते.
आता कोणालाही प्रश्न पडेल की उपाशीपोटी साखरेचे प्रमाण 110 ते 126 च्या मध्ये, 75 ग्रॅम ग्लुकोज घेऊन दोन तासांनी साखरेचे प्रमाण 140 ते 200 च्या मध्ये असेल किंवा एच. बी. ए. 1 सी. 5.7 ते 6.5 च्या मध्ये असेल तर त्याला काय म्हणायचे. उपाशीपोटी 110 ते 126 च्या मध्ये साखर असेल तर त्याला ‘इम्पेर्ड फास्टिंग ग्लुकोज’ म्हणतात. 75 ग्रॅम ग्लुकोज घेऊन दोन तासानंतरच्या 140 ते 200 मध्ये असलेल्या साखरेला ‘इम्पेर्ड ग्लुकोज टॉलरन्स’ म्हणतात.
‘इम्पेर्ड फास्टिंग ग्लुकोज’, ‘इम्पेर्ड ग्लुकोज टॉलरन्स’, आणि एच. बी. ए. 1 सी. 5.7 ते 6.5 च्या मध्ये असणे यातील कोणतीही एक गोष्ट असेल तर त्याला प्री-डायबेटीस म्हणतात.
या प्री-डायबेटीस ला मराठी शब्द काय योजावा याचा विचार करीत होतो. डायबेटीस आणि ओबेसिटी या दोन्ही गोष्टी एकत्र असतील तर त्याला डाटाबेसिटी असे म्हणतात. त्याला मला मराठी शब्द पटकन सुचला होता – मधुमेद. तसेच प्री-डायबेटीस ला मराठी शब्द सुचला ‘अव्यक्त मधुमेह’. ‘रिव्हर्सल ऑफ डायबेटीस’ ला तसाच शब्द सुचला मधुमेहाची माघार.
ही दोन नावे कशी वाटतात? या पेक्षा सोपी आणि चांगली नावे सुचली तर इनबॉक्स मध्ये जरूर कळवा
© नितीन पाटणकर एम डी