स्टिव्हिया

स्टिव्हिया (स्टिव्हिया रेबुडीयाना) हे एका झुडपाचे नाव आहे. कुणाला उत्सुकता असेल तर, आपण ज्याला ‘झाडंझुडपं’ म्हणतो त्यातील झाड आणि झुडूप यातील फरक समजावून घ्यायला हरकत नाही. हे झुडूप हे क्रायसॅनथेमम कुटुंबातील सदस्य आहे. क्रायसॅनथेमम कुटुंब हे एस्टरेसीए या मोठा कुटुंबाचा भाग आहे. ‘गाजर गवत’ किंवा ‘काँग्रेस गवत’ म्हणतात ते हे कुटुंब. ही वंशावळ लिहिण्याचे कारण, ज्या लोकांना या गवतांची ऍलर्जी असते त्यांनी या झाडांच्या वाट्याला जाऊ नये. स्टिव्हिया हे पॅराग्वे, ब्राझील आणि अर्जेन्टिना या देशातील स्थानिक झुडूप आहे. कॅनडा, भारत आणि युरोपातील काही देश इथे गेल्या दशकापासून त्याची लागवड होते. स्टिव्हिया हे त्यातून मिळणाऱ्या गोडकर (sweetner) रसायनासाठी प्रसिद्ध आहे.

गोडकर आणि ऊर्जारहित (zero calorie) म्हणून स्टिव्हिया वापरताना त्याची पाने व पानाची भुकटी शक्यतो वापरू नये कारण त्यातून जिवाणू किंवा बुरशीजन्य रोग होऊ शकतात. अनेक देशात जिथे स्वछता आणि आरोग्याचे नियम पाळले जातात तिथे अशी पाने व पानाची भुकटी वापरायला बंदी आहे. तिथे स्टिव्हिया म्हणून जो गोडकर पदार्थ मिळतो तो म्हणजे या पानातील एक रसायन वेगळे करून ते भुकटी किंवा द्रावणाच्या स्वरूपात मिळते. त्या रसायनाचे नाव आहे रेबीडुओसाईड ए (rebaudioside A किंवा Reb-A). हे रसायन अन्न पूरक (food additive) किंवा ‘गोडकर’ म्हणून वापरायला परवानगी आहे. ग्रास (Generally Recognised as Safe) या गटात त्याचे वर्गीकरण केलेले आहे. गरोदरपणात देखील हे सुरक्षितपणे वापरता येते असे उत्पादक सांगत असले तरी त्यावरील चाचण्या झालेल्या नाहीत.

स्टिव्हिया किंवा इतर गोडकर पदार्थच्या वापरात एक ग्यानबाची मेख आहे. हे गोडकर पदार्थ हे साखरेपेक्षा १५० ते ६०० पट जास्त गोड असतात. जिभेवरील गोड आणि कडू चवीचे वाहक (receptors) एकाच असतात. गोड चवीची तीव्रता जितकी जास्त तितकी टी चव कडू लागायला लागते. म्हणूनच या सर्व गोडकर पदार्थाना कडू अंत चव (after taste) असते. तोंड गोड तर करायचं आहे पण कडू करायचं नाही ही जिभेवरची कसरत असते. अगदी सूक्ष्म प्रमाणात हे गोडकर पदार्थ वापरायला लागतात.

हे शक्य होण्यासाठी त्या पदार्थासोबत माल्टोडेक्सट्रिन किंवा एरीथ्रिटोल सारखे पदार्थ मिसळावे लागतात. या मिसळणामुळे या गोडकर पदरतांमुळे पोट फुगणे, गुबारा धरणे, किंवा पातळ शौच होणे असे त्रास होऊ शकतात. तसेच या मिसळण्यामुळे त्याची ऊर्जारहित (zero calorie) ही ओळखही पुसली जाते.
स्टिव्हिया वापरून बनवलेल्या पेढ्याचे उदाहरण घेऊ. यातून आणखी काही गमतीशीर गोष्टी समोर येतील. एक पेढा हा २० ग्राम वजनाचा आहे असे समजूया. यात १० ग्राम खवा आणि दहा ग्राम साखर असते. १० ग्राम खवा म्हणजे अंदाजे ९० कॅलरीज. १० ग्राम साखरेतून येतात ४० कॅलरीज. म्हणजे वीस ग्राम पेढयातून मिळतात १३० कॅलरीज.आता हाच पेढा स्टिव्हिया वापरून बनवला. १० ग्राम साखरेऐवजी समजा १ ग्राम स्टिव्हिया वापरले. तर उरलेले ९ ग्राम अतिरिक्त खवा वापरायला लागतो म्हणजे खवा १९ ग्राम. त्यातून मिळतात १७१ कॅलरीज. चाळीस कॅलरीज जास्त. बरे हा पेढा सुगरफ्री स्टिव्हिया पासून बनल्यामुळे एरवी एक पेढा खाल्ला असता तिथे दोन खाल्ले जातात. म्हणजे मिळाल्या ३४२ कॅलरीज. त्यामुळे गोडकर पदार्थ वापरून केलेले ऍन खाऊन एकूण कॅलरीचे प्रमाण वाढते.
या उलट जर स्टिव्हिया वापरून जर लिंबूपाणी किंवा सोडा असे कॅलरी मुक्त पदार्थ सेवन केले तर त्यातील गोड चवीमुळे इन्सुलिन पाझरते. त्यामुळे पुढील काही तासात जास्त भूक लागून जास्त अन्न घेतले जाते. याला ‘सेकण्ड मील इफेक्ट’ म्हणतात.
असे गोडकर पदार्थ वापरून बनवलेले अन्न किंवा पेय सेवन केल्याने आतड्यातील चांगले जिवाणू बाधित होतात आणि नको असलेले जिवाणू वाढतात असेही अनेक चाह्ण्यातून दिसून आले आहे.

हे सगळे लक्षात घेतले की गोडकर पदार्थ नक्की वापरायचे तरी कुठे कधी आणि कशासाठी हा प्रश्न नेहमी पडतो. आपण साखर न वापरता गोड चवीचा आस्वाद घेत आहोत असे मनाचे समाधान मात्र नक्की मिळते. शेवटी काय मनाचे समाधान महत्वाचे.डॉ. नितीन पाटणकर एम.डी. (मेडिसिन)

Dr Nitin Patankar
Consultant – Diabetes, Obesity and Lifestyle Disorders
Wisdom Clinic – Mulund
Jupiter Hospital Thane
Contact : 9223145555

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X